वृत्तसंस्था, रियाध
अरब राष्ट्रांचे प्रमुख नेते आणि इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी शनिवारी सौदीच्या राजधानीत तातडीच्या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाचे लोण इतर देशांत पसरण्याआधीच थांबावे, या आग्रही मागणीसह अन्य तातडीच्या उपाययोजनावर विचारविनिमय करण्यासाठी अरब राष्ट्रांची संघटना ‘अरब लीग’ आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची (ओआयसी) ही तातडीची बैठक होत आहे.
पूर्वनियोजनानुसार ‘अरब लीग’ आणि ‘ओआयसी’च्या स्वतंत्र बैठका होणार होत्या. मात्र, सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सकाळी या दोन्ही संघटनांची एकत्रित बैठक होईल, असे जाहीर केले. गाझा आणि पॅलेस्टाईन क्षेत्रात निर्माण झालेली अत्यंत स्फोटक स्थिती, धोकादायक संघर्ष आणि हजारो नागरिकांच्या जिवाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन अरब राष्ट्रे आणि इस्लामिक राष्ट्रांचे या युद्धाविषयी एकच धोरण अधोरेखित व्हावे, एकजूट दिसावी, यासाठी ही बैठक एकत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त सौदीच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिले. पॅलेस्टाईन आणि तेथील नागरिकांना पािठबा देण्यासाठी, इस्रायलचे आक्रमक धोरण आणि या भागाच्या घेतलेल्या कब्जाचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्या गुन्ह्यांसाठी त्यांना जबाबदार धरण्यासाठी अरब राष्ट्रांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठपुरावा घेण्याचे ‘अरब लीग’चे उद्दिष्ट असल्याचे या गटाचे सहाय्यक सरचिटणीस होसम झाकी यांनी सांगितले.