मंदिरे आणि मठांवरील मालमत्ता, पाणी आणि सांडपाणी कर माफ करण्याचे वचन योगी आदित्यनाथ सरकारने २०२२ मध्ये दिले होते. त्यानुसार, हे कर माफ करण्यात आले आहेत. परंतु, या कराच्या जागी अयोध्या महानगरपालिकेने प्रतिकात्मक कर लागू केला आहे. दि प्रिंटने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अयोध्या नगर निगमच्या अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दि प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, हा प्रतिकात्मक कर १ एप्रिल २०२३ पासून लागू करण्यात आला आहे. या कराला अनेक पुजाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. या करामुळे मोठ्या घटकांना फायदा होत असल्याचा दावाही पुजाऱ्यांनी केला.

१ हजार चौरस फुटांपर्यंतच्या मंदिरांना एक हजार रुपये वार्षिक कर, एक ते तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या मंदिर किंवा मठांसाठी तीन हजार रुपये तर, ३ हजारपेक्षा जास्त चौरस फुटांच्या मालमत्तांसाठी ५ हजार रुपये कर आकरला जातो. अयोध्येत अनेक मंदिरे आणि मठ आहेत जे १० हजार चौरस फूट क्षेत्रफळात आहेत तर काही १५ हजार चौरस फुटांवर पसरलेले आहेत. त्यामुळे पाच हजार चौरस फुटावर पसरलेल्या मंदिरांनाही ५ हजार कर भरावा लागत आणि १५ हजार चौरस फुट असलेल्या मंदिरांनाही ५ हजार रुपये कर भरावा लागतो, याला पुजाऱ्यांचा विरोध आहे.

हेही वाचा >> “टेलिग्रामवर लिक झालेला डेटा…”, कोविनबाबत राज्यमंत्र्यांनी दिली माहिती; म्हणाले…

२०२२ मध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने मंदिर आणि मठांवरील कर माफ करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक सर्वेक्षण करून अयोध्येतील १०८० संस्थांना मालमत्ता, पाणी आणि सांडपाणी करातून सूट मिळाली होती. जी मंदिरे आणि मठ व्यावसायिक कार्यांमध्ये गुंतलेली आढळली त्यांना या सूटमधून वगळण्यात आलं होतं. यामुळे व्यावसायिक कामात न गुंतलेल्या मठ आणि मंदिरांना काढून टाकल्यानंतर केवळ ७८३ मठ आणि मंदिरांना ही सूट लागू झाली होती. परंतु, त्यांच्यावर आता प्रतिकात्मक कराचा बोजा लादण्यात आला आहे. ७८३ पैकी ४०० संस्थांनी हा प्रतिकात्मक कर भरला आहे.

अनेक पुजारी असा दावा करतात की अनेक लहान मंदिरे आणि मठ हा कर भरण्यास विरोध करत आहेत. कारण, त्यांना अधिकृतपणे पुन्हा कराच्या कक्षेत आणण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर, हा कर भरण्यास विलंब झाल्यास त्यावर १२ टक्के व्याजही आकारण्यात येत आहे. काही लोक आपल्या घरांत मंदिरे असल्याचा दावा करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात, अशा मंदिरांना सूट देण्यापासून परावृत्त करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are ayodhya temples tax free no theres a catch and priests arent happy about it sgk
Show comments