अहमद पटेल यांचा निवडणूक आयोगाला सवाल
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले आहे. निवडणूक आयोग पंतप्रधानांचे अधिकृत दौरे संपण्याची वाट पाहत आहे का, असा टोलाही त्यांनी लगावला.
अहमद पटेल यांनी ट्विटरवरून आयोगाला लक्ष्य केले आहे. निवडणूक आयोग पंतप्रधानांना इतकी संधी कशासाठी देत आहे असा सवाल केला आहे. सरकारी खर्चाने पंतप्रधान दौरे करत आहेत. सरकारी कार्यक्रमांचा वापर राजकीय सभांसाठी केला जात असल्याची टीका पटेल यांनी केली आहे. चित्रवाणी, नभोवाणी तसेच मुद्रीत माध्यमात जनतेचा पैशाचा वापर करुन जाहिरातबाजी केली जात आहे असा आरोप पटेल यांनी ब्लॉगमध्ये केला आहे.
गेल्याच आठवडय़ात लखनौ येथे पत्रकारांशी बोलतना मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी लोकसभा निवडणूक वेळेत होईल असे जाहीर केले होते तसेच निवडणूक आयोगाची तयारी झाली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या स्थितीचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते.