नवी दिल्ली : संसदेतील सुरक्षाभंगाच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभागृहात येऊन कोणतीही टिप्पणी केली नसली तरी, या मुद्दय़ावरून विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीच्या कथित समर्थनाच्या भूमिकेवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीवर जोरदार हल्लोबाल केला.
‘विरोधी पक्षांनी विरोधी बाकांवरच बसण्याची मानसिक तयारी केली आहे. ‘इंडिया’च्या आघाडीला २०२४ मध्ये आत्तापेक्षाही कमी जागा मिळतील,’ असा शाब्दिक प्रहार मोदींनी केला. दिल्लीमध्ये ‘इंडिया’तील नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोदींनी विरोधकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. केंद्रातील भाजप सरकारला उखडून फेकून देण्याच्या एकमेव ध्येयाने ‘इंडिया’ महाआघाडी काम करत असली तरी, भाजपचा विचार विरोधकांपेक्षा पूर्ण वेगळा आहे. भारताचे भविष्य उज्ज्वल बनवणे हे भाजपचे ध्येय असून आपण त्या मार्गाने पुढे गेले पाहिजे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जगायचे आणि कार्यरत राहिले पाहिजे, असे विचार मोदींनी भाजपच्या खासदारांपुढे मांडले.
संसदेचे चालू हिवाळी अधिवेशन आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे अधिवेशन आहे. या अधिवेशनाचा हा अखेरचा आठवडा असल्याने भाजपच्या संसदीय पक्षाची ही अखेरची बैठक ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष नकारात्मक राजकारण करत असून काही लोकांच्या नशिबात सकारात्मक कार्य करणे लिहिलेले नाही. त्यामुळे विरोधक २०२४ मधील लोकसभा निवडणूक जिंकण्याची सुतराम शक्यता नाही, असा टोला मोदींनी हाणला.
हेही वाचा >>>८० लाख लोकांच्या नोकऱ्या जाणार, ‘या’ गाड्या भारतात कोणत्याही किमतीत येऊ देणार नाही; नितीन गडकरींची ठाम भूमिका
विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे बिथरून न जाता संसदेतील कामकाजामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मोदींनी पक्ष खासदारांना केल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी बैठकीनंतर दिली. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती तसेच फौजदारी संहितेसंदर्भातील तीन अशी चार महत्त्वपूर्ण विधेयके अजून संसदेमध्ये मंजूर होणे बाकी असून या प्रलंबित विधेयकांचा पुढील १००-५० वर्षे प्रभाव राहील. त्यामुळे भाजपच्या खासदारांनी सभागृहांमध्ये उपस्थित राहावे व विधेयकांच्या चर्चामध्ये सहभागी व्हावे, असा सल्ला मोदींनी दिल्याचे जोशी यांनी सांगितले.
घटनेचे समर्थन चिंताजनक
संसदेच्या सुरक्षाभंगाच्या घटना अत्यंत गंभीर असून तिचा सर्वानी निषेध करायला हवा होता; पण काही पक्षांनी या घटनेचे समर्थन केले आहे. या पक्षांची भूमिका घटनेइतकीच चिंताजनक आहे, असे मोदी बैठकीत म्हणाले. विरोधक संविधानाचा आणि संसदेचाही अपमान करत आहेत, अशी टीका मोदींनी केली.
‘नमो अॅप’कडून कलचाचणी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो अॅप’ने मंगळवारी ‘जन मन सव्र्हे’ या सर्वेक्षणाला सुरुवात केली. त्यामध्ये सरकार व स्थानिक खासदाराच्या कामगिरीसह विविध मुद्दय़ांवर लोकांचा कल जाणून घेतला जाणार आहे. त्याबरोबरच खासदारांच्या मतदारसंघांमध्ये इतर लोकप्रिय नेते कोणते आहेत याचाही अंदाज या अॅपद्वारे घेतला जाईल, अशी माहिती भाजपच्या नेत्यांनी दिली.