Bengaluru : देशभरात दररोज अनेक वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडत असल्याची माहिती समोर येत. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचंही पाहायला मिळतं. अनेकदा अपघातांचे फोटो किंवा व्हिडीओही समोर येतात. यामध्ये काही अपघाताचे व्हिडीओ तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारे असतात. आता अशाच प्रकारे एक धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. बेंगळुरूमधील नेलमंगला हायवे टोलवर एका व्यक्तीला एका कारने तब्बल ५० मीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही संपूर्ण घटना टोल नाक्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेला वाद या घटनेचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नेलमंगला हायवे टोलवर दोन्ही वाहने टोल भरण्यासाठी टोलच्या नाक्यावर पोहोचली तेव्हा त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला.
या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसतंय की गाडीचा चालक दुसऱ्या एका व्यक्तीचा शर्ट पकडडून टोल गेट उघडल्यानंतरही तो सोडत नाही. यानंतर कार पुढे नेत ती व्यक्ती कारबरोबर फरफटत नेल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तब्बल ५० मीटरपर्यंत कारने फरफटत नेल्यानंतर ती व्यक्ती रस्त्यावर पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसेच यानंतर त्या कार चालकाने तेथून पळ काढल्याचंही दिसून येत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. टोलवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.