‘द किंग ऑफ इस्रायल’, ‘द लायन ऑफ गॉड’ या बिरुदावल्या मिरवणारे इस्रायलचे माजी पंतप्रधान एरियल शेरॉन (८५) यांचे शनिवारी  निधन झाले. २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्यानंतर आठ वर्षांपासून ते कोमात गेले होते. इस्रायलच्या स्वातंत्र्ययुद्धापासून ते अरब राष्ट्रांविरोधाती कडव्या लढाईपर्यंत प्रत्येक संग्रामात आघाडीवर राहून नेतृत्व करणारे शेरॉन इस्रायलमध्ये ‘मि. सिक्युरिटी’ ओळखले जात होते. सैन्यातील कमांडर ते पंतप्रधान हा त्यांचा प्रवास चित्तथरारक होता. संरक्षणमंत्रिपदी असताना शेरॉन यांनी लेबनॉनविरोधात आघाडी उघडली होती. २००१ मध्ये शेरॉन इस्रायलच्या पंतप्रधानपदी निवडून आले. पदावर असतानाच २००६ मध्ये पक्षाघाताचा झटका आल्याापासून ते रुग्णशय्येवर होते. १ जानेवारीपासून त्यांची प्रकृती ढासळत गेली. अखेरीस शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.      
इस्रायलचे ११ वे पंतप्रधान असलेल्या शेरॉन यांच्या मृतदेहावर पंतप्रधान कार्यालयातर्फे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याप्रसंगी जगभरातील अनेक आजी-माजी राष्ट्रप्रमुख आणि नेते उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
शेरॉन यांच्या पत्नी लीली यांचे २००० साली निधन झाले होते. शेरॉन यांचा मृतदेह नेगेव्ह रेंच येथील त्यांच्या निवासस्थानानजीक आणि त्यांच्या पत्नीच्या शेजारीच दफन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मूत्रपिंड, फुफ्फुसे यांच्यासह शेरॉन यांचे अनेक अवयव अखेरच्या टप्प्यात निकामी झाले होते. सोमवारी हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेला त्यांचा रक्तप्रवाह आणि हृदयाचे ठोके गुरुवारी पुन्हा एकदा ढासळले आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
इस्रायलच्या स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक युद्धातील शेरॉन यांच्या भरीव कामगिरीमुळे त्यांना देशभरात ‘मि. सिक्युरिटी’ म्हणून ओळखले जात असे. त्यांच्याच संरक्षणमंत्रिपदाच्या काळात इस्रायलने १९८२ मध्ये लेबेनॉनवर हल्ला केला होता.

Story img Loader