शिवसेना ठाकरे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत बंडखोर गटाचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. त्यामुळे अर्जुन खोतकर ठाकरे गटातून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. यानंतर अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का? या प्रश्नावर स्वतः खोतकरांनीच भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२५ जुलै) दिल्लीत एबीपी माझाशी बोलत होते.
अर्जुन खोतकर म्हणाले, “हे खरं की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला आलो आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमावरून आले आणि योगायोगाने आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा होतेच. मात्र, त्याचे वेगळे अर्थ काढू नये. मी शिंदे गटात जाण्याबाबत काहीही निर्णय बदललेला नाही.”
हेही वाचा : “उद्धव ठाकरे स्वतः सुरतला गेले असते तर?”; संजय राऊतांकडून मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पोस्ट
“माझी एकनाथ शिंदे यांच्याशी केवळ भेट झालीय. भेट झाली याचा अर्थ मी पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेतच आहे,” असंही अर्जुन खोतकर यांनी नमूद केलं. असं असलं तरी भविष्यातही शिवसेनेतच राहणार का? यावर खोतकरांनी उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर याच अर्जुन खोतकरांनी बंडखोरांना उंदीर म्हणत टीका केली होती. आता त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलंय. खोतकरांचा बंडखोरांना उंदीर म्हटल्याचा व्हिडीओ देखील सध्या चर्चेत आहे.
शिंदे-खोतकर भेटीवेळी रावसाहेब दानवेही उपस्थित
दिल्लीत अर्जुन खोतकर व एकनाथ शिंदे यांच्या भेटीवेळी रावसाहेब दानवे देखील उपस्थित असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. खोतकर आणि दानवे यांच्यातील राजकीय वैर प्रसिद्ध आहे. मात्र, दिल्लीतील भेटीत एकनाथ शिंदे यांच्या एका बाजूला अर्जुन खोतकर, तर दुसऱ्या बाजूला रावसाहेब दानवे दिसत आहेत. त्यामुळे शिंदेंकडून हे राजकीय वैर संपवून खोतकरांना आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.