भारतीय सागरी भागात असलेल्या काही मालवाहू जहाजांमध्ये शस्त्रधारी व्यक्ती तैनात करण्यात येत असल्याने त्याची देशाच्या सुरक्षेस बाधा निर्माण होण्याची भीती असल्याचा इशारा तटरक्षक दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी दिला.
सध्या सागरी भागात उभ्या असलेल्या अनेक मालवाहू जहाजांमध्ये सुरक्षेच्या कारणावरून काही शस्त्रधारी व्यक्ती तैनात करण्यात येत आहेत. या परिस्थितीविषयी जहाज व्यवस्थापनाने जाहीर केले नसले तरी या प्रकारामुळे देशाच्या सागरी आणि राष्ट्रीय सुरक्षेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे, असे तटरक्षक दलाचे महानिरीक्षक, प्रादेशिक कमांडर सत्यप्रकाश शर्मा यांनी सांगितले. ‘एकात्मिक सागरी यंत्रणेवरील दृष्टिकोन’ यावरील परिसंवादाच्या पाश्र्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, समुद्री चाच्यांपासून जहाजांवरील मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी त्यावर शस्त्रधारी व्यक्ती तैनात केल्या जात असल्या तरी त्याचा सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विशेष म्हणजे अशा शस्त्रधारी व्यक्तींची कोणतीही तपासणी केली जात नाही. ते किनारी भागाकडे सरकत असताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, असेही ते म्हणाले.
नियमावली हवी
मालवाहू जहाजांवरील शस्त्रधारी व्यक्तींना नेमण्यासाठी देशात विशिष्ट आणि कडक नियमावली बनवणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे जाईल, असे शर्मा म्हणाले.