प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या गोळीबाराच्या पाश्र्वभूमीवर भारतीय लष्कराने परिस्थितीनुसार योग्य ती कारवाई करावी, असे स्पष्ट संकेत संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टनी यांनी दिले. ६ ऑगस्ट रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झाले होते. या प्रकरणी संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानबाबत मवाळ प्रतिक्रिया केल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांनी आक्रमक होत सीमेवरील तणावाच्या पाश्र्वभूमीवर भारतीय लष्कराने कारवाई करावी, असा संदेश आता दिला आहे.
आयएनएस विक्रांत या ३७ हजार ५०० टन वजनाच्या आणि संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानवाहू नौकेचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी भारतीय लष्कराबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबाबत प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असून अशा मुद्दय़ांवर संसदेबाहेर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ६ ऑगस्ट रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात पाच भारतीय जवान शहीद झालेल्या मुद्दय़ावरही त्यांनी बोलण्यास नकार दिला.
दरम्यान, नौदलाच्या बळकटीकरणाबाबत बोलताना अ‍ॅन्टनी म्हणाले की, थोडा उशीर झाला असला तरी संरक्षण मंत्रालयाने अधिक पाणबुडय़ा निर्मितीबाबतचा प्रस्ताव तयार केला असून कॅबिनेट समितीला पाठविण्यात आला आहे. तसेच रशियाकडून मिळालेली अ‍ॅडमिरल गोर्शकोव्ह ही विमानवाहू नौकाही येत्या वर्षांच्या अखेपर्यंत कार्यान्वित होईल, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा