नरेंद्र मोदी- नवाझ शरीफ भेटीनंतर अवघ्या आठवडाभरातच..
पठाणकोट येथील हवाई दलाचा तळ लक्ष्य; पाच दहशतवादी ठार; तीन जवान शहीद
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाहोरला अचानक दिलेल्या भेटीला आठवडाही उलटत नाही तोच पाकिस्तानी दहशतवाद्यांनी शनिवारी हवाई दलाच्या येथील तळाला लक्ष्य केले. सुरक्षा दले व दहशतवादी यांच्यात तब्बल आठ तास चकमक चालली. त्यात पाचही दहशतवादी ठार झाले तर हवाई दलाचे तीन जवान शहीद झाले.
हवाई दलाच्या येथील तळाला सामरिकदृष्टय़ा अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाकिस्तानी सीमेपासून अवघ्या ३५ किमी अंतरावरच हा तळ आहे. दोन हजार एकरांवर पसरलेल्या या तळावर मिग-२१ ही लढाऊ विमाने व एमआय-२५ ही हेलिकॉप्टर यांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे. या तळावर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास लष्करी वेशातील पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. ग्रेनेड लाँचर, मॉर्टर, एके-४७ बंदुका आदी शस्त्रांनिशी सज्ज असलेल्या या दहशतवाद्यांना शीघ्र कृती दल व सुरक्षा दलांनी अडवले. तेथूनच चकमकीला सुरुवात झाली. उभय बाजूने तुंबळ धुमश्चक्री झाली. तब्बल आठ तास चाललेल्या या धुमश्चक्रीत पाचही दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलांना यश आले. तर तीन जवान शहीद झाले.

जैश-ए-मोहम्मदचा हात?
या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांना पाकिस्तानातील बहावलपूर येथून जीपीएस यंत्रणेद्वारे हल्ल्यासाठी मार्गदर्शन केले जात होते. दरम्यान, हल्ला झाला त्यावेळी गोव्यात असलेल्या संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तातडीने दिल्लीला प्रयाण केले. त्यांनी तीनही सेनादलांच्या प्रमुखांशी चर्चा करून सर्व शक्याशक्यतांची चाचपणी केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्याशीही पर्रिकर यांनी चर्चा केली.

समन्वयाने कारवाई
गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती व त्याआधारे केलेली सज्जता यामुळे तळावरील हल्ला परतवून लावण्यात यश आल्याचे मत हवाई दलाने व्यक्त केले आहे. दहशतवाद्यांना मिग विमाने व एमआय-२५ ही हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त करायचे होते. मात्र, त्यांचा मनसुबा उधळून लावण्यात आम्हाला यश आले. गुप्तचर यंत्रणा व तीनही सुरक्षा दले यांच्यातील योग्य समन्वयामुळेच हे शक्य झाल्याचे हवाई दलातर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘त्या’ कर्मचाऱ्याची चौकशी
‘आयएसआय’साठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला हवाई दलाचा बडतर्फ कर्मचारी के. के. रणजित याची पठाणकोट हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्यात येणार आहे. तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
मानवतेच्या शत्रूंना भारताचा विकास पाहवत नाही. अशाच घटकांनी पठाणकोटमध्ये हल्ला चढवला. मात्र, आमच्या शूर जवानांनी त्यांचा हा मनसुबा उधळून लावला आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पठाणकोट हल्ल्यात ‘जैश ए मोहम्मद’ संघटनेचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया झाल्यास चोख प्रत्युत्तर देण्यात येईल,
– राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री

पंतप्रधानांच्या भेटीनंतरही आयएसआयने भारतीय भूमीवरील दहशतवादी हल्ले थांबविले नसल्याचे व तिचा दहशतवादी कारवायांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट होते. पाकव्याप्त काश्मीरमधील भारतविरोधी कारवायांना पाकिस्तानी संस्थांचे सक्रीय पाठबळ आहे. वीस वर्षांपासून शांत असलेल्या पंजाबमधील वाढत्या दहशतवादी कारवाया, ही काळजीची बाब आहे. या कारवाया थांबविण्यासाठी सरकारने कळीचे उपाय योजावेत.
– रणदीप सुर्जेवाला, काँग्रेस प्रवक्ते

Story img Loader