सलविंदर सिंग यांच्या वाहन अपहरणदरम्यान दहशतवाद्याचे संभाषण; पाकिस्तानातील संपर्कासाठी ‘त्याच’ भ्रमणध्वनीचा वापर
गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदर सिंग यांच्या अंगरक्षकाने त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचा भ्रमणध्वनी ताब्यात असणाऱ्या दहशतवाद्याने त्याला ‘सलाम वालेकुम’ म्हणून प्रतिसाद दिला. त्याच्यासह उर्वरित चार दहशतवाद्यांनी सिंग व इतर दोघांना मारहाण करून त्यांची गाडी व भ्रमणध्वनी ताब्यात घेतला होता.
याच भ्रमणध्वनीवरून त्यांनी पाकिस्तानात आपल्या म्होरक्यांशी संपर्क साधल्याचा अंदाज आहे. त्यांचे अंगरक्षक कुलविंदर सिंग या घटनेबाबत बोलताना म्हणाले की, पोलीस अधीक्षकांचे अपहरण झाल्यानंतर साडेतीनच्या सुमारास मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. फोन जोडला गेल्यानंतर जेव्हा मी ‘हॅलो’ म्हणालो, तेव्हा पलीकडून ‘सलाम वालेकुम’ असा प्रतिसाद आला. जेव्हा मी आपण कोण, असे विचारले, तेव्हा त्याने मलाही हाच प्रतिप्रश्न केला. त्या वेळी मी त्याला हा अधीक्षकांचा क्रमांक असल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कोण एसपीसाहेब, अशी विचारणा करत फोन बंद केला. मी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण पलीकडून कुठलेही उत्तर आले नाही. सिंग यांच्याशी त्यांचे वाहनचालक राजपाल सिंग यांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
सिंग यांची नुकतीच पंजाब हत्यारी पोलिसांच्या ७५व्या बटालियनच्या सहायक समादेशकपदी नियुक्ती झाली आहे. ते शनिवारी पहाटे नरोट जयमलसिंग ब्लॉक येथून परतत असताना दहशतवाद्यांनी त्यांना अडविले व मारहाण करून त्यांना गाडीतून ढकलून दिले. पोलिसांना त्यांचे वाहन भारत-पाक सीमेनजीक अकालगढ गावाजवळ सापडले.
या ठिकाणापासून पठाणकोट विमानतळ केवळ ५०० मीटर अंतरावर आहे. याच अतिरेक्यांनी येथील कथलोर पुलानजीक एका टॅक्सीचालकाचीही हत्या केल्याचाही संशय आहे. त्यानंतर सिंग यांची महिंद्रा एक्सयुव्ही ५०० ही गाडी ताब्यात घेत त्याच गाडीतून सिंग यांच्यासह त्यांचा ज्वेलर मित्र राजेश शर्मा व आचाऱ्याचे अपहरण केले. वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, या अतिरेक्यांनी पाकिस्तानातील सूत्रधारांशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा भ्रमणध्वनी वापरला. याच मोबाईलवरून एकाने आपल्या आईशीही संपर्क साधला होता. सिंग यांचा भ्रमणध्वनी मात्र त्यांनी तोडून टाकला. त्यानंतर अकालगढपासून दहा किलोमीटर अंतरावरील सांबली गावानजीक सिंग आणि त्यांच्या आचाऱ्यालाही गाडीबाहेर ढकलण्यात आले. वर्मा यांना मात्र या अतिरेक्यांनी सोडले नाही.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या दोघांचेही सिंग यांच्या पगडीने हात बांधण्यात आले होते. तसेच, काम संपवून येईपर्यंत त्यांना जागेवरून न हलण्याबद्दल धमकावले. सिंग पोलीस अधिकारी असल्याचे अतिरेक्यांना वर्मा यांच्याकडून समजले. फोनवरून कुणाशी तरी बोलताना त्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याला गाडीतून ढकलल्याचा उल्लेख केला. त्यावेळी पलीकडून त्यांना सिंग यांना पुन्हा ताब्यात घेण्याचा आदेश देण्यात आला. पण, ते संबंधित स्थळी पोहोचण्यापूर्वीच सिंग व आचारी तिथून निसटण्यात यशस्वी ठरले.
संतापलेल्या अतिरेक्यांनी वर्मा यांना ठार मारण्याचे ठरविले. त्यांनी वर्मा यांची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, मृत झाल्याचे सोंग वठविणाऱ्या वर्मा यांचा प्राण वाचला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे अतिरेकी एकमेकांशी अल्फा, मेजर, कमांडर अशा सांकेतिक नावांनी संवाद साधत होते.

Story img Loader