येथे हवाई दलाच्या तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांची सकाळ गोळीबारांच्या आवाजातच उजाडली. पाकिस्तानच्या संशयित दहशतवाद्यांनी पहाटे हल्ला केला. या वेळी धुमश्चक्रीत चार हल्लेखोर ठार तर तीन सुरक्षा जवान हुतात्मा झाले.
हवाई दलाने दहशतवाद्यांवर कारवाई करताना हेलिकॉप्टर्सचा वापर केला व जोरदार तपास मोहीमही सुरू केली. ढाकी भागातील रहिवासी दिनेश शर्मा यांनी सांगितले की, मी सकाळी मोठे आवाज ऐकले. त्यामुळे काय झाले हे पाहण्यासाठी जिना चढून वर गेलो, तर गोळीबाराचे आणखी आवाज ऐकू आले. हवाई दलाच्या तळापासून शर्मा यांचे घर ७००-८०० मीटर अंतरावर आहे. त्यांनी सांगितले की, पोलिस अधीक्षकांच्या अपहरणानंतर शुक्रवारपासूनच पोलिस बंदोबस्त वाढवला होता, दहशतवादी हल्ल्याची शक्यता वाटत होती. रात्रभर हेलिकॉप्टर्स घिरटय़ा घालत होते. त्यामुळे अधिक माहितीसाठी टीव्ही बघत होतो असे शर्मा म्हणाले. सकाळी गोळीबाराचे आवाज ऐकू आल्याचे ढाकी भागातील सुरजित सिंग यांनी सांगितले.
भारतीय हवाई दल केंद्राच्या परिसरात एसडी कॉलेज आहे, तेथील परीक्षा दहशतवादी हल्ल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कॉलेजचे प्राचार्य समींद्र शर्मा यांनी सांगितले की, आम्ही शारीरिक शिक्षणाच्या परीक्षा लांबणीवर टाक ल्या आहेत, त्या आता ९ जानेवारीला होतील.शर्मा म्हणाले की, लोकांमध्ये आताच्या घटनेनंतर घबराट नाही, सुरक्षा दले दहशतवाद्यांना संपवतील याची आम्हाला खात्री आहे, माझी मुलगी डॉक्टर असून ती पीसीएमएस या नरोट जैमाल सिंग भागात कामाला गेली आहे. या हल्ल्यानंतर पठाणकोटमधील हवाई तळाच्या परिसरात मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पठाणकोट व इतर भागात पंजाब पोलिस वाहनांची तपासणी करीत आहेत.

Untitled-11

 

1