पाकिस्तानी मोबाइलवरून सूचना
पठाणकोटच्या एअरफोर्स स्टेशनवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांच्या (हँडलर्स) सतत संपर्कात होते, इतकेच नव्हे तर त्या सूत्रधारांनी पाकिस्तानच्या मोबाइल क्रमांकावरून फोन करून हल्लेखोरांसाठी टॅक्सीची व्यवस्था केली होती.
दहशतवाद्यांनी शुक्रवारी सुरुवातीला टोयोटा इनोव्हा मोटार वापरली होती आणि तिच्या चालकाला पाकिस्तानी क्रमांकावरून फोन करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले. हा चालक दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या पाकिस्तानमधील तस्करांना नियमित सेवा देत होता, की तो फोन पाकिस्तानी क्रमांकावरून आल्याची जाणीव त्याला नव्हती, याबाबत सुरक्षा संस्था त्याची चौकशी करत आहेत.
हल्लेखोरांनी या चालकाला पठाणकोटजवळील एका विशिष्ट जागी बोलावले होते व तेथूनच ते मोटारीत बसले. त्यांनी मोटार एका कच्च्या रस्त्यावरून न्यायला लावली आणि काही वेळात तिची रिम निकामी झाल्यानंतर मोटार सोडून दिली.यानंतर दहशतवाद्यांनी पंजाब पोलिसांच्या एका अधीक्षकासह तिघेजण प्रवास करत असलेली महिंद्र एसयूव्ही एक्स-५०० पळवून नेली. पोलीस अधीक्षक व त्यांचा आचारी यांना बळजबरीने खाली उतरवले आणि सराफा व्यापारी असलेल्या त्यांच्या मित्राला ओलीस ठेवले.दहशतवाद्यांनी या लोकांजवळून एक मोबाइल फोन हिसकावून घेतला आणि ज्या क्रमांकावरून टोयोटाच्या चालकाला फोन आला होता, त्यावर फोन करण्यासाठी या मोबाइलचा वापर केला. या क्रमांकावरून त्यांनी तीनवेळा त्यांच्या सूत्रधारांना फोन केला. आपल्या एका नातेवाईकालाही फोन करून त्यांनी आपण एका आत्मघातकी मोहिमेवर असल्याचे सांगितले. त्या पाकिस्तानी मोबाइल क्रमांकावरून सूत्रधार दहशतवाद्यांना सतत सूचना देत होते, असे सुरक्षा संस्थांच्या निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी क्रमांक सुरक्षा संस्थांच्या पाळतीखाली असल्यामुळे त्यांना दहशतवाद्यांचे संभाव्य लक्ष्य शोधून काढणे शक्य झाले. त्यामुळे कमांडोज आणि लष्कराचे विशेष दल घटनास्थळी पाठवण्यात आले.