अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कर सुवर्णमंदिरात जाऊ शकते, तर नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहचू शकत नाही का, असा सवाल करीत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांच्याविरोधात मोठय़ा प्रमाणात लष्करी कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत अखिल भारतीय दहशवादविरोधी दलाचे प्रमुख एम. एस. बिट्टा यांनी बुधवारी येथे नोंदविले.  
छत्तीगडमध्ये कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेवर नक्षलवाद्यांनी २५ मे रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. यात कॉंग्रेसचे नेते योगेंद्र शर्मा यांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांची बिट्टा यांनी बुधवारी भेट घेतली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील मत नोंदविले. या नरसंहाराला जबाबदार असलेल्या नक्षलवाद्यांच्या ठिकाणावर लष्कराची जोरदार कारवाई झाली पाहिजे. या कारवाईत त्यांचा संपुर्ण बिमोड झाला पाहिजे. केंद्र आणि छत्तीसगडमधील सरकार यांनी नक्षलवाद्यांविरोधात योग्य ती पावले वेळीच उचलली नाहीत. तसेच गुप्तचर यंत्रणांनाही याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे या हल्ल्यात तेही तितकेच जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि गुप्तचर यंत्रणेच्या अपयशामुळे हा हल्ला झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याच निष्काळजीपणामुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
छत्तीसगडमधील हल्ल्याला जबाबदार असलेल्या आधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर अशा प्रकारच्या घटनांचे निकाल त्वरीत लागण्यासाठी आणि यातील दोषींवर कारवाई होण्यासाठी अतिरेकी कारवाई विरोधी लष्करी न्यायलय स्थापन करण्याची मागणीही बिट्टा यांनी या वेळी केली.

Story img Loader