भारताच्या संरक्षणव्यवस्थेविषयी गंभीर चिंता उत्त्पन्न करणारे दोन अहवाल महालेखापरिक्षकांकडून (कॅग) प्रकाशित करण्यात आले आहेत. यापैकी एका अहवालानूसार भारतीय लष्कराला सध्या मोठ्याप्रमाणावर शस्त्रास्त्रांचा तुटवडा भासत असून, निकराची युद्धप्रसंग उद्भवल्यास लष्कराकडे फक्त २० दिवस पुरेल इतकाच शस्त्रसाठा असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. भारतीय सैन्य वापरत असलेल्या एकूण शस्त्रास्त्रांपैकी ५० टक्के शस्त्रास्त्रांचा साठा हा १० दिवस पुरले इतकाच आहे. त्यामुळे कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने किमान ४० दिवस पुरेल इतका शस्त्रसाठा असणे आवश्यक असल्याचे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे. तर अन्य एका अहवालात तेजस हे लढाऊ विमान युद्धात भारतीय वायुदलाची कमकुवत बाजू ठरु शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
कॅग’ने संरक्षण मंत्रालय आणि शस्त्रास्त्र निर्मिती बोर्डाच्या (ओएफबी)कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओएफबी हे सैन्यदलाला पुरेशी साधन-सामुग्री उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत आहे, असे कॅगने अहवालात म्हटले आहे. त्यामुळे एकप्रकारे संरक्षण मंत्रालयावरही कॅगने निशाणा साधला आहे. कॅगच्या म्हणण्यानुसार, सुमारे दीड हजार कोटी रुपयांचा शस्त्रसाठा हा दर्जेदार नसल्याने आणि अन्य कारणाने फेटाळण्यात आला.मोदी सरकारमधील विदेश राज्यमंत्री व्ही के सिंह हे भारतीय भूदलाचे प्रमुख होते, तेव्हा त्यांनीही शस्त्रसाठी अपुरा असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

Story img Loader