केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी आणलेल्या अग्निपथ योजनेला देशभरातून कडाडून विरोध केला जातोय. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा अशा मोठ्या राज्यांमध्ये तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना मागे घ्या अशी मागणी या तरुणांकडून केली जात आहे. दरम्यान, देशभरातून या योजनेला विरोध होत असताना लष्करात भरती होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण चक्क रडताना दिसत असून ही योजना मागे घ्यावी अशी मागणी तो सरकारी अधिकाऱ्याला करताना दिसत आहे.
हेही वाचा >>> …म्हणून देशातील तरुणांनी स्वतःचं तारुण्य उद्ध्वस्त करण्याचा मार्ग निवडला : असदुद्दीन ओवेसी
मिळालेल्या माहितीनुसार हरियाणा राज्यातील पानिपत येथील हा व्हिडीओ आहे. हा तरुण अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी आंदोलन करताना दिसतोय. शासकीय अधिकारी दिसताच त्याला रडू कोसळले आहे. त्याने आपले डोके या अधिकाऱ्याच्या खांद्यावर ठेवले असून तो रडताना दिसतोय. तसेच “काका अग्निपथ या योजनेला रद्द करा. मी सैन्यात भरती होण्यासाठी मागील चार वर्षांपासून प्रयत्न करतोय. सैन्यात दाखल होण्याचं माझं स्वप्न आहे. माझं करिअर खराब होईल,” अशी विनवणी हा तरुण शासकीय अधिकाऱ्याला करताना दिसतोय.
हेही वाचा >>> अग्निपथ योजना : ‘…तर वाद उरतोच कुठे? विरोधकांकडून युवकांची माथी भडकवण्याचे काम,’ केंद्रीय मंत्री व्ही.के. सिंह यांचा आरोप
तरुणाच्या डोळ्यांतून अश्रू आल्यानंतर शासकीय अधिकऱ्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कायदा हातामध्ये घेऊ नको. तुला जी अडचण आहे; तुझे जे म्हणणे आहे, ते मला लिखित स्वरुपात दे. मी हे सरकारपर्यंत पोहोचवतो, असे हा अधिकारी तरुणाला सांगताना दिसतोय.
हेही वाचा >>> ‘अग्निपथ योजना मागे घ्या’; जंतरमंतरवर काँग्रेसचा ‘सत्याग्रह’
दरम्यान, अग्निपथ या योजनेला देशभरातून विरोध केला जात असून राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा अशा राज्यांतील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहारमध्ये तर रेल्वे गाड्यांना आग लावून देण्यात आली आहे. तसेच काही तरुण आक्रमक झाले असून येथे काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे तरुणांचा वाढता विरोध लक्षात घेता केंद्र सरकारने अग्निपथ योजनेद्वारे आणखी काही सवलती दिल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसारख्या राज्यांनी पोलीस तसेच इतर शासकीय नोकऱ्यांमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले आहे. तरीदेखील या योजनेला रद्द करावे, अशी मागणी तरुणांकडून केली जात आहे.