जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान लष्कराचा श्वान गंभीर जखमी झाला आहे. सुरक्षा जवानांना काही दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील तांगपावा परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर परिसराला घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमवारी सकाळी लष्कराने दहशतवादी लपलेल्या ठिकाणी आपला श्वान ‘झूम’ याला पाठवलं. “झूम हा प्रशिक्षित श्वान असून, दिलेली जबाबदारी पार पाडतो. दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्यात आलं आहे,” अशी माहिती लष्कर अधिकाऱ्याने दिली आहे.

‘झूम’ लष्कराच्या अनेक मोहिमांमध्ये सहभागी झाला असल्याचंही अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सोमवारी ‘झूम’वर नेहमीप्रमाणे दहशतवाद्यांना लपलेल्या ठिकाणाहून बाहेर काढायचं होतं. पण या कारवाईदरम्यान त्याला दोन गोळ्या लागल्या असून तो जखमी झाला आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, “झूमने दहशतवाद्यांवर हल्ला केला असता त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. पण यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला. ज्यामुळे दोन दहशतवादी ठार झाले”.

‘झूम’ला जखमी अवस्थेत लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याच्यावर उपचार सुरु असल्याचं लष्कराने सांगितलं आहे.

चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे दोन दहशतवादी ठार झाले असून कारवाईदरम्यान भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army assault dog injured during encounter between security forces and militants in anantnag district of jammu and kashmir sgy