सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्याने नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय होत नाही. लष्करप्रमुख नियुक्तीचा मुद्दा निवडणूक आयोगाच्या विचाराधीन असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
नव्या लष्करप्रमुख निवडीबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र हे वृत्त निराधार व खोडसाळपणाचे आहे, असे निवडणूक आयोगाचे उपायुक्त विनोद झुत्शी यांनी सांगितले. या मुद्दय़ाबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येणार आहे, असे झुत्शी यांनी सांगितले.
सुरक्षा दलांमधील नियुक्ती, बढती, निविदा यांबाबतचे निर्णय घेताना निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात येऊ नये, असा निर्णय निवडणूक आयोगाच्या समितीने २७ मार्च रोजी घेतला होता. या निर्णयावर पुन्हा एकदा समितीच्या सदस्यांची चर्चा होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
नव्या लष्करप्रमुखांची नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला घाई झालेली आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. सध्या निवडणुका सुरू असल्याने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाला घेऊ द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. गेल्या आठवडय़ात संरक्षण मंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे हा मुद्दा पाठविला आणि त्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. निवडणूक आयोगाच्या समितीने २७ मार्च रोजीच हा मुद्दा आचारसंहितेच्या कक्षात येत नसल्याचा निर्वाळा दिला असतानाही संरक्षण मंत्रालयाने हा मुद्दा पुन्हा निवडणूक आयोगाकडे का पाठविला, अशी टीका होत असतानाच सर्व संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेणे गरजेचे असल्याने हा मुद्दा निवडणूक आयोगाकडे पाठविला, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने दिले.

Story img Loader