सीमेपलीकडून भारतात घडविण्यात येणाऱ्या दहशतवादी कारवाया भारत शांतपणे पाहणार नाही, असे लष्कराने शुक्रवारी पाकिस्तानला खडसावले. उभय देशांमध्ये विश्वासाचे वातावरण वृद्धिंगत होण्यास पाकिस्तान सहकार्य करील, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे. सीमेपलीकडून येणारे दहशतवादी भारतात रक्तपात घडवून आणत आहेत आणि लष्करी पातळीवर आम्ही तुमच्याशी हातमिळवणी करू, अशी तुमची अपेक्षा आहे का, असा सवाल करून लष्करप्रमुख जन. विक्रमसिंग यांनी, हे शक्य नसल्याचे पाकिस्तानला खडसावले आहे.
दहशतवाद्यांवर आमचे नियंत्रण नाही, असे सांगून पाकिस्तान दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोपही विक्रमसिंग यांनी केला. एकीकडे सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया घडत असताना दुसरीकडे परस्पर विश्वास निर्माण करण्याची भाषा करणे अयोग्य आहे. त्यामुळे प्रथम अशा प्रकारांना पायबंद घालावा आणि त्यानंतरच पुढील चर्चा होईल, असेही लष्करप्रमुख म्हणाले.
पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन पाकिस्तानने दिल्यासच दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते, दुहेरी भूमिकेचा अवलंब केल्यास परस्पर विश्वास वृद्धिंगत होणार नाही, असेही ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा