पीटीआय, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर, परंतु संवेदनशील असून कोणत्याही संरक्षणविषयक आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी केले.

‘लष्कर दिना’च्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनरल पांडे म्हणाले, ‘‘पूर्व लडाख सीमेलगतची भारतीय लष्कराची सज्जता उच्च दर्जाची आहे. त्याचबरोबर चीनशी संबंधित उर्वरित मुद्दय़ांवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांत लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा चालू आहेत.’’

हेही वाचा >>>गोवा-कर्नाटकच्या प्रवासात काय घडलं? कशी होती सूचना सेठची वागणूक? कॅबचालकाने सांगितला धक्कादायक घटनाक्रम!

जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबद्दल जनरल पांडे म्हणाले की, घुसखोरीचे प्रयत्न झाले असले तरी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानबरोबर ‘युद्धबंदी समझोता’ कायम आहे. भारतीय लष्कर नियंत्रण रेषेजवळील घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे, परंतु राजौरी-पूँछ क्षेत्रामध्ये हिंसक घटना वाढल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. विविध दहशतवादी गटांना पाकिस्तानचा पाठिंबा मिळत असल्याचा स्पष्ट संदर्भ देत ते म्हणाले की, सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांत वाढ झाली आहे.

भूतान आणि चीन यांच्यातील सीमावाद सोडवण्याच्या चर्चेबाबत विचारले असता, जनरल पांडे म्हणाले की, भारताच्या सुरक्षिततेशी संबंधित घडामोडींवर लक्ष आहे. भारताचे भूतानशी मजबूत लष्करी संबंध आहेत. त्यामुळे तेथील घटनांचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. लष्करप्रमुखांनी भारत-म्यानमार सीमेवरील परिस्थिती ‘चिंतेची बाब’ असल्याचेही नमूद केले.

‘म्यानमार सीमा अशांत’

म्यानमार सीमेजवळील परिस्थिती चिंताजनक आहे. तेथील काही बंडखोर मणिपूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करीत आहेत. तथापि, म्यानमारमधील वांशिक गट आणि त्या देशाच्या सैन्यातील संघर्षांमुळे भारतात आलेल्या ४१६ सैनिकांना परत पाठवण्यात आल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दिली. भारतीय लष्कराचे सर्व घडामोडींवर बारीक लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

सैन्यदलाच्या संपूर्ण आधुनिकीकरणाचा भाग म्हणून २०२४ हे वर्ष भारतीय लष्करासाठी तंत्रज्ञान वर्ष असेल. – जनरल मनोज पांडे, लष्करप्रमुख