पुंछ/जम्मू : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील (एलओसी) सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी सर्व सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी सैन्याने स्थिर राहण्याचे आवाहन त्यांनी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
३० जून रोजी भारतीय लष्कराचे ३० वे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जम्मूचा हा त्यांचा पहिला दौरा होता. अमरनाथ यात्रा आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या पार्श्वभूमीवर द्विवेदी यांच्या जम्मू दौऱ्याला महत्त्व आले आहे. लष्करप्रमुख द्विवेदी यांनी उत्तरेकडील लष्करी कमांडर लेफ्टनंट जनरल सुचिंद्र कुमार आणि जम्मूस्थित ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’चे प्रमुख नवीन सचदेवा यांच्याबरोबर ‘व्हाइट नाइट कॉर्प्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘१६ व्या कोअर’च्या ठिकाणांना भेट दिली. तसेच नियंत्रण रेषेवरील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.