वृत्तसंस्था, खार्तुम : सुदानचे सैन्य देशात लोकशाही राजवट आणण्यासाठी वचनबद्ध आहे असा दावा सैन्यप्रमुख जनरल अब्दुल फतेह बुऱ्हान यांनी शुक्रवारी केला. सुदानमध्ये गेल्या शनिवारपासून सैन्य आणि रॅपिड सपोर्ट फोर्स (आरएसएफ) या निमलष्करी दलादरम्यान सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे. सुरुवातीला राजधानी खार्तुममध्ये सुरू झालेली हिंसा आता सुदानच्या इतर शहरांमध्ये पसरली आहे. ईद-उल-फित्रचा सण जवळ येत असतानाही ही हिंसा थांबलेली नाही.
सुदानमधील हिंसेत आतापर्यंत किमान ४१३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर साडेतीन हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधी माहिती दिली आहे. मृतांमध्ये किमान नऊ लहान मुलांचा समावेश आहे, तर किमान ५० लहान मुले जखमी झाले आहेत असे संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेने सांगितले. अमेरिकेच्या आवाहनला प्रतिसाद देऊन ईदसाठी तीन दिवस हिंसा थांबवण्यास तयार असल्याचे जनरल मोहम्मद हमदान दगालो यांच्या नेतृत्वाखालील आरएसएफने जाहीर केले, सैन्याकडून मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
सुदानमध्ये हिंसा सुरू झाल्यापासून जनरल बुऱ्हान यांनी पहिल्यांदाच, ईदच्या निमित्ताने भाषण केले, त्यामध्ये त्यांनी लोकशाहीबद्दल असलेली बांधिलकी व्यक्त केली. आमचे प्रशिक्षण, शहाणपण आणि सामथ्र्य यांच्या जोरावर आम्ही सध्याच्या संकटावर मात करू असा विश्वास त्यांनी या भाषणादरम्यान व्यक्त केला. याद्वारे ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे. मात्र, सुदानमधील अल्पकालीन लोकशाही सत्ता उलथून लावण्यासाठी केलेल्या बंडात खुद्द जनरल बुऱ्हान हेच सहभागी होते, त्यामुळे त्यांचे दावे पोकळ असल्याची टीका होत आहे. हिंसा थांबत नसल्यामुळे नागरिक आता आपापले घर सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. शहरांबाहेर जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा मृतदेहांचा खच पडला असल्याचे माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. खार्तुममध्ये आता कोणतीच जागा सुरक्षित नसल्याचे या प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
पंतप्रधानांकडून भारतीयांच्या सुरक्षिततेचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक घेऊ सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. सुदानमध्ये सध्या ३ हजारांपेक्षा जास्त भारतीय नागरिक आहेत. बैठकीमध्ये मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या, सुदानमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या आणि तेथील भारतीयांच्या सुरक्षेचे मूल्यमापन करण्याच्या सूचना दिल्या अशी माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, हवाई दलाचे प्रमुख, नौदलाचे प्रमुख, परराष्ट्र तसेच संरक्षण विभागातील उच्च अधिकारी आणि वरिष्ठ राजनैतिक अधिकारी यांनी या बैठकीला ऑनलाइन उपस्थिती लावली. परराष्ट्रमंत्री सध्या गयानामध्ये आहेत.