Indian Army dog Phantom: भारतीय लष्कराच्या मदतीला तैनात असलेला चार वर्षांचा ‘फँटम’ हा बेल्जियन शेफर्ड जातीचा श्वान दहशतवाद्यांच्या चकमकीत सोमवारी ठार झाला. जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील खूर येथे दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक उडाली. त्यात फँटमला गोळी लागून त्याचा मृत्यू झाला. लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्स या अधिकृत एक्स हँडलवरून याबद्दलची माहिती देण्यात आली. सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी भारतीय लष्कराच्या तुकडीने दहशतवाद्यांना घेरले असताना त्यांच्याकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. यात एक गोळी फँटमला लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आम्ही आमच्या नायकाच्या सर्वोच्च बलिदानाला सलाम करतो. फँटम हा श्वानपथकामधील एक शूरवीर होता. त्याचे समर्पन, निष्ठा कधीही विसरता येणार नाही, अशी पोस्ट व्हाईट नाइट कॉर्प्स या एक्स हँडलवर टाकण्यात आली आहे. तसेच नियंत्रण रेषेजवळ सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता दहशतवाद्यांनी एका लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला केला. जम्मू शहरापासून ८५ किमी अंतरावर असलेल्या अखनूरमधील खोर येथे आठ तास दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक सुरू होती.

फँटम हा २०२२ साली भारतीय लष्करात दाखल झाला होता. मागच्या वर्षांपासून दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेला तो दुसरा श्वान आहे. सप्टेंबर २०२३ मध्य लॅब्राडोर जातीची मादी श्वान केंट हीचा राजौरी जिल्ह्यात चकमकीत मृत्यू झाला होता.

लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा माग काढण्यासाठी लष्कराकडून श्वानांचा वापर केला जातो. श्वानांना विविध गॅझेट लावलेली असतात त्यावरून दहशतवाद्यांचे ठिकाण आणि अंतर तपासले जाते. अखनूरमध्ये तीन दहशतवादी लपून बसले असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, त्याने भारतीय लष्कराच्या जवानाचा गणवेश परिधान केला होता. हे अतिरेकी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित असावेत, असा संशय व्यक्त केला जात आहे.

विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मागच्या दोन आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये आठ दहशतवादी हल्ले झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army dog phantom dies in anti terror ops in jammu and kashmir akhnoor kvg