केरण परिसरात दडून बसलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय लष्कराने घुसखोरीविरोधात व्यापक मोहीम उघडली असून अन्य घुसखोरांच्या घुसखोरीचा डावही हाणून पाडल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. त्या परिसरात शोधमोहीम सुरूच आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी गेल्या आठवडय़ात येथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.
गेल्या २४ सप्टेंबर रोजी शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि आता परिस्थितीवर एकूण नियंत्रण आणण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नियंत्रण रेषेजवळच्या केरण क्षेत्राच्या शालाभट या गावी घुसखोर दडून बसले असल्याची खबर लष्करी अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यांच्याविरोधात कारवाई सुरूच असून हल्ल्याचे स्वरूप आणि अन्य बाबी बघता, ते घुसखोरच असल्याचे स्पष्ट झाले होते आणि या वेळच्या घुसखोरीचे स्वरूप वेगळे होते, असे लेफ्ट. जनरल गुरमित सिंग यांनी सांगितले.
गेल्या बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या लष्करी कारवाईदरम्यान भारताचे पाच सैनिक जखमी झाले आहेत. या सर्व सैनिकांना उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगून यासंबंधी अधिक काही माहिती देण्यास सिंग यांनी नकार दिला.या घुसखोरीत पाकिस्तानी लष्कराचा हात आहे की नाही ते आताच सांगणे योग्य ठरणार नाही परंतु त्यांचे काही खास सैनिक यामध्ये निश्चितपणे गुंतल्याचे खात्रीलायक संकेत मिळाले असल्याचे त्यांनी सूचित केले.