स्वातंत्र्योत्तर काळापासून जम्मू-काश्मीरमधील मंत्र्यांना लष्कराकडून पैसा पुरवला जात असल्याचे विधान करून माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी मंगळवारी नव्या वादळाला निमंत्रण दिले. सिंग यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप नोंदवत काश्मीरमधील सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने अशा मंत्र्यांची नावे उघड करण्याचे आव्हान त्यांना दिले, तर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनीही सिंग यांनी नावे सांगितल्यास त्या मंत्र्यांची चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले. या विधानावरून राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसताच सिंग यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन हा पैसा लाच म्हणून नव्हे तर ‘सद्भावना’ कार्यासाठी दिल्याची सारवासारव केली.
जम्मू काश्मीरमध्ये स्थैर्य राहावे यासाठी लष्कराकडून गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील मंत्र्यांना पैसा पुरवला जातो, असे एका वृत्तवाहिनीशी सोमवारी बोलताना सिंग म्हणाले होते. काही मंत्री व लोकांना काही गोष्टी करण्यासाठी पैसे दिले गेले, त्याचा उपयोग स्थिरतेसाठी अपेक्षित होता, असे ते म्हणाले.
सिंग यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात नवे वादळ उभे राहिले. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी माजी लष्करप्रमुखांच्या या आरोपाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. सिंग यांच्या आरोपांत तथ्य आढळल्यास पक्षाचे सर्व मंत्री राजीनामा देतील, असेही पक्षाने म्हटले आहे. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे संकेत दिले.
सिंग यांच्या विधानावरून राजकीय वादळ निर्माण झाल्यानंतर मंगळवारी नवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘काही राजकारण्यांना पैसे दिले गेले, असे सांगून मी काही चूक केलेली नाही. हा पैसा त्यांच्या वैयक्तिक वा राजकीय वापरासाठी नव्हता, तर जम्मू काश्मीरमधील जनतेची मने जिंकण्यासाठी, राज्यात स्थैर्य आणण्यासाठी होता. जनतेला फुटीरतावाद्यांपासून दूर ठेवण्यासाठी सद्भावनेच्या हेतून हा पैसा पुरवला गेला,’ असे ते म्हणाले.
‘..तर सिंग अडचणीत येतील’
नवी दिल्ली : वादग्रस्त विधाने करून काहीसे अडचणीत आलेले माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंग यांनी ईशान्येकडील घुसखोरीसंबंधीआपल्याला दिलेले सल्ले उघड केले तर ते अधिकच अडचणीत येतील, असा गौप्यस्फोट आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी मंगळवारी येथे केला. उच्च पदे धारण करणाऱ्यांनी आपल्या निवृत्तीनंतर गुप्तता राखावी असा सल्ला देत व्ही.के.सिंग हे सध्या वागत आहेत, तसे त्यांनी वर्तन करायला नको होते, असे गोगोई यांनी सांगितले.
व्ही. के. सिंग यांचा गौप्यस्फोट आणि कोलांटउडी
स्वातंत्र्योत्तर काळापासून जम्मू-काश्मीरमधील मंत्र्यांना लष्कराकडून पैसा पुरवला जात असल्याचे विधान करून माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी मंगळवारी नव्या वादळाला निमंत्रण दिले.
आणखी वाचा
First published on: 25-09-2013 at 04:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army has paid all ministers in jk for stabilising the state says v k singh