गेल्या आठवडय़ात मणिपूरमध्ये ईशान्येकडील बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. त्यानंतर पाच दिवस शोध घेऊन लष्कराने म्यानमारमध्ये कारवाई केली. त्यात २० अतिरेकी ठार झाले. म्यानमार व भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारताबाहेरची लष्कराची ही पहिलीच संयुक्त कारवाईची वेळ आहे.
मणिपूरमध्ये जवानांच्या वाहनावर झालेल्या आजपर्यंतच्या सर्वात मोठय़ा हल्ल्यात १८ जवान शहीद, तर ११ जण जखमी झाले होते. यानंतर लष्कराने शोधमोहीम उघडली होती. तिला मंगळवारी यश आले. सर्व दहशतवादी म्यानमारला पळून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे म्यानमारच्या लष्कराची मदत घेण्यात आली. म्यानमार सीमेवर लष्कराने दोन ठिकाणी कारवाई करून २० अतिरेक्यांना कंठस्नान घातले, असे लष्कराचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल रणवीर सिंह यांनी सांगितले.
हल्ल्याला चीनची फूस?
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वतीने काम करणारा उल्फाचा नेता परेश बरूआ याने एनएससीएन-के गटाचा एस. एस. खापलांग याला भारत सरकारविरोधातील शस्त्रसंधी तोडण्यास राजी केले होते. खापलांग व बरूआ हे म्यानमार, रूईली व कुमिंगदरम्यान ये-जा करतात. ते दोन्ही भाग चीनमध्ये आहेत. बरूआ व खापलांग नेहमी चीनच्या संपर्कात असतात, अशीही माहिती तेथील सूत्रांनी दिली.