स्नो मॅरेथॉन जिंकून येणाऱ्या मेजर आणि १६ लष्करी सैनिकांवर एका ढाबा मालकाने आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला चढवला आणि या सगळ्यांना मारहाण केली. या घटनेत मेजर आणि काही जवान जखमी झाले आहेत. ३० ते ३५ जणांनी या सगळ्यांवर हल्ला चढवत त्यांना मारहाण केली. पंजाबच्या मनाली रोपड रोडवर ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मंगळवारी सकाळी या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. स्काऊट्स मेजर सचिन सिंह कुंतल आणि इतर सैनिक मागच्या दोन दिवसांपासून स्नो मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यानंतर ही स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर मनालीहून पलचान या ठिकाणाहून परतत होते. तेव्हाच हा हल्ला झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंडी मंदिर या ठिकाणी जाणाऱ्या जवानांचं पथक सव्वानऊ च्या सुमारास रोपड जिल्ह्यातील भरतगढ या ठिकाणी एका ढाब्यावर जेवायला थांबलं होतं. जेवण झाल्यानंतर जवान आणि ढाबा मालक यांच्यात पैसे देण्यावरुन वाद झाला होता. आम्हाला गुगल पे किंवा युपीआयवरुन पैसे देऊ नका रोख रक्कम द्या असं ढाबा मालकाचं म्हणणं होतं. त्यावरुन बाचाबाची सुरु झाली. ज्यानंतर ३० ते ३५ जणांनी या जवानांवर हल्ला करत त्यांना मारहाण केली. या जवानांना लाठ्यांनी मारण्यात आलं. या हल्ल्यात मेजर आणि काही सैनिकांच्या हाताला, पायाला आणि डोक्याला इजा झाली आहे. मेजर आणि हे सैनिक बेशुद्ध झाले. ज्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या सगळ्यांना रोपड या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.