शहराच्या वेशीबाहेर सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद तर अन्य दोनजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सीमा सुरक्षा दलाच्या ८व्या पलटणीतील जवानांच्या तुकडीवर गुरुवारी सकाळी हा हल्ला करण्यात आला.
शहराच्या वेशीबाहेर चनापोरा पुलावरून सीमा सुरक्षा दलाच्या ८व्या पलटणीतील तीन जवान जात असताना अतिरेक्यांनी त्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तीनही जवान जखमी झाले. त्यांना तातडीने बदामीबाग छावणीतील लष्कराच्या ९२ बेस रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यातील एका जवानाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या कानाला गोळी लागल्याने त्याची प्राणज्योत मालवली, असे पोलिसांनी सांगितले.
कलिता असे हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात हेम सिंह आणि सायकिया हे अन्य दोन जवानही जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Story img Loader