भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांना अनेकदा आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काही अधिकारी लठ्ठपणा तसेच इतर आजारांनी त्रस्त होतात. ही समस्या लक्षात घेऊन भारतीय लष्करातील अधिकाऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. लष्करी अधिकारी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (फिट) असावेत, या उद्देशाने लष्कराच्या सर्व कमांड्सना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्राद्वारे नव्या नियमावलीची माहिती देण्यात आली आहे. अनेकदा देशाअंतर्गत तसेच देशाबाहेरील मोहिमेवर असलेल्या अधिकाऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावतात.
नव्या बदलानुसार ब्रिगेडियर रँकवरील अधिकाऱ्याकडून अधिकारी तसेच जवानांची फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. या आधी कमांडिंग ऑफिसरकडून जवानांची दर तीन महिन्यांच्या अंतराने फिटनेस टेस्ट घेतली जात होती. सध्या प्रत्येक जवान व अधिकाऱ्याच्या शारीरिक तंदुरुस्तीची नोंद APAC card (Army Physical Fitness Assessment card) वर केली जाते. भारतीय लष्कराकडून अधिकारी व जवानांची शारीरिक कार्यक्षमता तपासण्यासाठी दर तीन महिन्यांच्या अंतराने दोन चाचण्या घेतल्या जातात. युद्ध शारीरिक कार्यक्षमता चाचणी (BPPT-Battle Physical Efficiency Test) व शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PPT-Physical Proficiency Test) अशी या चाचण्यांची नावे आहेत. प्रत्येक जवानाच्या शारीरिक चाचणीच्या निकालाची नोंद एसीआर (Annual Confidential Report) मध्ये नोंदवून घेतली जाते.
हेही वाचा : कॅनडाच्या नव्या इमिग्रेशन कायद्यामुळे पंजाबमधील सौभाग्यकांक्षिणींचे स्वप्नभंग, नेमकं प्रकरण काय?
या दोन चाचण्यांसमवेत आता आणखी एक चाचणी लष्करी अधिकाऱ्यांसाठी बंधनकारक असणार आहे. त्यानुसार दर सहा महिन्यांनी १० किमी स्पीड मार्च, ३२ किमी रुट मार्च व वर्षातून एकदा ५० मीटर जलतरण चाचणी अधिकाऱ्यांना द्यावी लागणार आहे. नव्या धोरणानुसार या चाचण्यांमध्ये लठ्ठपणामुळे अपयशी होणाऱ्या अधिकाऱ्यांना वजन कमी करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. तसेच वजन कमी करण्यासाठी त्यांना लेखी माहिती पुरवली जाणार आहे. गरज पडल्यास त्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात देखील होऊ शकते. याबाबत लष्करातील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की लष्करातील अधिकाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती खालावत असल्याने नव्या नियमावलीची गरज होती. त्यादृष्टीने कौतुकास्पद पाऊल उचलण्यात आले आहे.