तमिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील तिरुवन्नामलाई येथील एका महिलेला जमावाने मारहाण केली आहे. ही महिला बेशुद्ध होईपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. १०० हून अधिक लोकांच्या जमावाने या महिलेला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच यासंबंधी आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेच्या पतीने जो भारतीय सैन्यातला जवान (सध्या काश्मीरमध्ये तैनात) आहे त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे जवानाने तमिळनाडू सरकारकडे न्याय मागितला आहे.
या महिलेची परिस्थिती सध्या गंभीर आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेच्या पतीने शेअर केलेल्या व्हिडीओत त्याने म्हटलं आहे की, “मी देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी भारतीय सैन्यात दाखल झालोय, मी सध्या काश्मीरमध्ये तैनात आहे. माझ्या घरापासून शेकडो किलोमीटर दूर आहे. तिकडे माझ्या पत्नीला १२० गुंडांनी अर्धनग्न करून बेदम मारहाण केली आहे.” या व्हिडिओमध्ये तो हात जोडून गुडघ्यावर बसून न्याय मागताना दिसत आहे.
भारतीय सैन्यदलातील जवान हवालदार प्रभाकरन यांच्या पत्नीला स्थानिक गुंडानी जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेला उपचारांसाठी वेल्लोर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
तामिळनाडू माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष एन. टी आगराजन म्हणाले की, मी या घटनेचा निषेध करतो. आपण कोणत्या जगात आहोत? तामिळनाडूमध्ये असलेल्या आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी काश्मीरमध्ये कर्तव्यावर असलेल्या लष्करातील जवानाची ही दयनीय अवस्था पाहवत नाही. जेव्हा एखादा सैनिक देशाच्या रक्षणासाठी जातो तेव्हा त्या सैनिकाची पत्नी आणि कुटुंबाची काळजी घेणं ही सरकारची सर्वोच्च जबाबदारी असते.
दरम्यान, तमिळनाडू भाजपा प्रदेशाध्यक्षाने पीडित महिलेशी फोनवरून बातचित केली. त्यांनी ट्विट केलं आहे की, माझं हवालदार प्रभाकरन आणि त्यांच्या पत्नीशी फोनवर बोलणं झालं. त्यांचं दुःख ऐकून खूपन वेदना झाल्या. आपल्या तमिळ भूमीवर हा प्रकार घडल्याची मला लाज वाटते. आमच्या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी या महिलेला भेटायला जाणार आहेत. भाजपा या महिलेला न्याय मिळवून देईल. तसेच आम्ही प्रभाकरन यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आोत.
हे ही वाचा >> आळंदी : “नियोजनाच्या नावाखाली मंदिरात…”, वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्यावरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, या प्रकरणावर तिरुवन्नमलाईचे पोलीस अधीक्षक कार्तिकेयन म्हणाले, रेणुगंबल मंदिराच्या मालकीच्या जागेवर भाडेतत्त्वावर घेतलेल्या दुकानावरून हा वाद निर्माण झाला होता. कीर्ती नावाच्या महिलेवर हल्ला झाला नाही. काल हा वाद झाला तेव्हा कीर्ती आणि तिची आई घटनास्थळी होत्या. हा मुद्दा रंगवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.