जम्मू-काश्मीरमधील पूंछ-जम्मू महामार्गावर एका लष्कराच्या वाहनाला भीषण आग लागून पाच जवानांचा मृत्यू झाला आहे. संबंधित वाहनातून रॉकेलची वाहतूक केली जात होती, त्यामुळे चालत्या वाहनाला आग लागून ही दुर्दैवी घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यामुळे ही घटना घडली असल्याची माहिती नॉर्दन कमांडने दिली आहे.
‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, संबंधित लष्कराचं वाहन पूंछ जिल्ह्यातील भिंबर येथून संगिओतकडे जात होतं. यावेळी पूंछ-जम्मू महामार्गावर दहशतवाद्यांनी या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारानंतर लष्कराच्या वाहनाला आग लागली, या आगीत पाच जवानांचा होरपळून मृत्यू झाला. पूंछ जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि धुक्याचा फायदा घेत अज्ञात दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा वापर केल्यामुळे गाडीला आग लागली, अशी माहिती नॉर्दन कमांडने दिली.
दहशतवादी हल्ला झाल्यानंतरचा व्हिडीओ
“या दुर्दैवी घटनेत दहशतवादविरोधी कारवायांसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या पाच जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अन्य एक जवान गंभीर जखमी झाला आहे. संबंधित जवानाला तत्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत,” असंही नॉर्दन कमांडने सांगितले. या हल्ल्याप्रकरणी लष्कराकडून पुढील कारवाई केली जात आहे.