नवी दिल्ली/भुवनेश्वर : प्राप्तिकर विभागाने ओडिशातील मद्य उत्पादक कंपन्यांच्या समूहावर आणि त्यांच्याशी संबंधित उद्योगांवर टाकलेल्या छाप्यानंतर जप्त केलेली बेहिशेबी रोख रक्कम २९० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. प्राप्तिकर विभागाच्या एका छापेमारी मोहिमेत मिळालेले ही काळय़ा पैशाची सर्वात मोठी रोख रक्कम ठरणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड’ आणि संबंधित अन्य कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर ६ डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईनंतर, प्राप्तिकर विभागाकडून नोटा मोजण्यासाठी सुमारे ४० छोटी-मोठी यंत्रे वापरली जात आहेत.
हेही वाचा >>> धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या
मोजणी प्रक्रियेसाठी प्राप्तिकर विभाग आणि बँकेचे आणखी कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. याशिवाय जप्त केलेली रोकड सरकारी बँकांमध्ये पोहोचवण्यासाठी विभागाने आणखी वाहनांची मागणी केली आहे. या कारवाईचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते आणि झारखंडचे राज्यसभा सदस्य धीरजप्रसाद साहू यांच्या जागेवरही छापे टाकल्याचे समजते. या संदर्भात खासदार साहू यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच वृत्तसंस्थेने मद्य उत्पादक कंपन्यांच्या एका समूहाला ‘ई-मेल’ही पाठवला. मात्र, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीचे विविध अधिकारी आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींचे जबाब नोंदवले जात आहेत. शनिवापर्यंत रोख रकमेची मोजणी पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे समजते. जप्त केलेली ही रक्कम सुमारे २९० कोटी असण्याची शक्यता व्यक्त करून अधिकाऱ्यांनी सांगितले, की आतापर्यंत २५० कोटींहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे.