अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यात येणार असून त्यात रामलल्लाच्या मूर्तीवर गाभाऱ्यामध्ये सूर्यकिरण पडतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने दिली आहे. ओडिशातील तेराव्या शतकातल्या कोणार्क सूर्यमंदिरापासून ही प्रेरणा घेण्यात आली आहे.
मंदिराच्या रचनेची निश्चिाती करण्यात येत असून त्यात दर रामनवमीला सूर्याचे किरण रामलल्लाच्या मूर्तीवर पडतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी वैज्ञानिक, खगोलवैज्ञानिक, तंत्रज्ञ यांचा सल्ला घेतला जाणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे कामेश्वार चौपाल यांनी दिली. चौपाल यांनी सांगितले की, ओडिशातील कोणार्कचे सूर्यमंदिर याचे उत्तम उदाहरण असून त्या मंदिरात सूर्यकिरण पडतात. राम मंदिरात तशी व्यवस्था करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून सूर्यकिरण मंदिराच्या गाभाऱ्यात पडणार आहेत. त्यांनी सांगितले की, यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बिल्डींग कन्स्ट्रक्शन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी रुरकी यांचा सल्लागार गट तयार केला जात आहे, हा गट तांत्रिक सल्ला देईल.
रामायणावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा
भोपाळ : मध्य प्रदेशमधील भाजप सरकार रामायणावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करणार असून, तिच्या विजेत्यांना भव्य राममंदिर उभारले जात असलेल्या उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात विमानाने जाण्याची संधी मिळेल, असे राज्याच्या पर्यटन, संस्कृती व अध्यात्ममंत्री उषा ठाकूर यांनी सांगितले. ‘रामायण’ महाकाव्यावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाईल, असे रविवारी अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
या स्पर्धेच्या विजेत्यांना विमानाने अयोध्येला प्रवास करण्याची संधी मिळेल असे या निवेदनात नमूद केले आहे; मात्र ही स्पर्धा केव्हा घेतली जाईल आणि किती विजेत्यांची निवड करण्यात येईल याचा त्यात उल्लेख करण्यात आलेला नाही.
‘अयोध्याकांडात’ शब्दबद्ध करण्यात आलेल्या मूल्यनिर्मितीच्या घटनांवर आधारित दुसऱ्या एका सामान्य ज्ञान स्पर्धेचे इंदूर जिल्ह्यातील महू येथील डॉ. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठात रविवारी सायंकाळी उद्घाटन करताना ठाकूर यांनी ही घोषणा केली.
मंत्र्यांनी रविवारी सायंकाळी उद्घाटन केलेल्या स्पर्धेच्या आधारावर राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून चार विद्यार्थ्यांसह आठ जण निवडले जातील. मध्य प्रदेशच्या संस्कृती विभागाने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
‘डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्णत्वास’
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, श्रीराम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत ते पूर्ण होईल. गाभाऱ्याचे कामही पूर्ण करण्यात येणार असून लोक तेथे दर्शन घेऊ शकतील. राममंदिर उभारताना भूगर्भशास्त्र, भूगोल, परिसंस्था यांचा विचार केला जाणार आहे. भूगर्भशास्त्राच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश हा भूकंपप्रवण आहे. १५ नोव्हेंबरपासून मंदिराच्या खांबांचे काम सुरू होत असून नंतर एप्रिल २०२२ मध्ये पुढील काम केले जाणार आहे.
मंदिराच्या आधीच्या प्रारूपात बदल करण्यात आले असून त्यात तीन मजले करण्यात आले आहेत. आधी दोन मजल्यांचे नियोजन होते.