पीटीआय, ढाका

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने गुरुवारी माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह ४५ जणांविरोधात अटक वॉरंट काढले. बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर त्यांना पद सोडावे लागले. त्या नंतर भारतात आल्या. खून, सामूहिक हत्याकांडासह इतर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.

गुन्हे लवादाची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या पहिल्या दिवसाच्या सुनावणीतच हसीना यांच्यासह अवामी लीग पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. न्या. महंमद गुलाम मोर्तुझा माजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील लवादाने हे वॉरंट बजावले. हसीना आणि इतर ४५ जणांना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयासमोर उपस्थित करण्याचे आदेशही लवादाने दिले.

हेही वाचा >>>पिझ्झाच्या तुकड्यावरून कुटुंबात झाला राडा; वाद विकोपाला जाताच महिलेवर गोळीबार, कुठी घडली घटना?

हसीना आणि इतर ४५ जणांविरोधात आतापर्यंत ६० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात बेपत्ता करणे, खून, सामूहिक हत्याकांडाचे गुन्हे दाखल आहेत. यात हसीना यांच्या मित्रपक्षांतील नेते, पत्रकार आणि इतरांचाही समावेश आहे. हसीना यांच्याविरोधात प्रामुख्याने खुनाचे गुन्हे दाखल आहेत. हसीना यांचे सरकार बांगलादेशात कोसळल्यानंतर झालेल्या हिंसाचारात हजारांहून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले.

इंटरपोल’ची मदत घेणार

हसीना सध्या भारतात असून, अज्ञात ठिकाणी त्या राहत आहेत. हसीना यांच्यासह इतरांना बांगलादेशात परत आणण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्यात येईल, असे लवादाचे मुख्य सरकारी वकील ताजुल इस्लाम यांनी सांगितले. बांगलादेशमधील हंगामी सरकारने अद्याप हसीना यांना बांगलादेशात परत पाठविण्याची मागणी केलेली नाही.