जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराने चकमकीदरम्यान जिवंत पकडलेला दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झाले आहे. सैफउल्ला उर्फ बहादुर अली असे या दहशतवाद्याचे नाव असून तो सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात आहे. ‘एनआय’ने केलेल्या चौकशीत त्याने पाकिस्तानमधील लाहोर येथील रहिवासी असल्याची कबुली दिली आहे. लष्कर-ए-तोयबाने आपल्याला विशेष प्रशिक्षण देऊन भारतात पाठविल्याचेही बहादुर अलीने सांगितले आहे. त्याचा हा जबाब रेकॉर्ड करण्यात आला आहे. पुढील चौकशीसाठी ‘एनआयए’कडून त्याला दिल्लीत आणण्यात येणार आहे.
भारतीय सुरक्षा दलाने सोमवारी नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यावेळी बहादुर अलीला जिवंत पकडण्यात आले होते. त्याला जिवंत पकडणे सुरक्षा यंत्रणांच्यादृष्टीने मोठे यश मानले जात आहे. बहादुर अलीला पकडण्यात आले तेव्हा त्याच्याकडे २३ हजार रूपये , तीन एके-४७ रायफल, दोन पिस्तुले सापडली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, बहादुरने चौकशीदरम्यान एनआयएला महत्वपूर्ण माहिती दिली आहे. काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा त्याच्याकडून कळाला आहे. याशिवाय, पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद येथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचीही माहिती चौकशीदरम्यान पुढे आली आहे.
Arrested Kupwara terrorist Bahadur Ali to be brought to Delhi by NIA for further investigation: NIA sources
— ANI (@ANI_news) July 28, 2016