वृत्तसंस्था, पॅरिस
फ्रान्सच्या हाय-स्पीड रेल्वे सेवेच्या रुळांवर तोडफोड, जाळपोळ करण्यात आली आहे. ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी, पॅरिसकडे जाणाऱ्या उत्तर, पूर्व आणि पश्चिमेकडील मुख्य मार्ग टप्प्याटप्प्याने लक्ष्य केले गेले. त्यामुळे ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभाच्या काही तास आधी पॅरिसचा प्रवास ठप्प झाला. यामुळे लाखो प्रवासी अडकून पडले आहेत.रेल्वे रुळांचे मोठे नुकसान झाले असून या घटनांमुळे रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामाला आठवडाभराचा कालावधी लागू शकतो. याचा रेल्वे वाहतुकीवर गंभीर परिणाम होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फ्रान्सचे पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांनी समाजमाध्यमांवर सांगितले की, गुन्हेगारांना शोधण्यासाठी फ्रेंच गुप्तचर यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. अटल यांनी या घटनांना ‘पूर्वनियोजित’ म्हटले आहे. मात्र, या घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आग लागल्याच्या काही ठिकाणांवरून काही लोक पळून जाताना आढळले आहेत. तेथून आग लावण्याची उपकरणे जप्त करण्यात आली आहेत, या घटनांमुळे पॅरिसला उर्वरित फ्रान्स आणि शेजारील देशांशी जोडणाऱ्या अनेक हाय-स्पीड लाईन्स ठप्प झाल्या आहेत, अशी माहिती वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हेरग्रीएट यांनी दिली.
फ्रेंच अधिकाऱ्यांनी ऑलिम्पिकमध्ये व्यत्यय आणण्याचे अनेक डाव उधळून लावले आहेत. खेळात व्यत्यय आणण्याच्या नियोजनाच्या संशयावरून एका रशियन व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच शुक्रवारी, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवरील बासेल-मुलहाऊसचे फ्रेंच विमानतळ सकाळी रिकामे करण्यात आले आणि ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ तात्पुरते बंद ठेवण्यात आले. यामागे रेल्वे हल्ल्याचा संबंध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही.उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी पॅरिसला जाणाऱ्या ट्रेनमधून दोन जर्मन खेळाडूंना रेल्वे मार्ग बंद झाल्यामुळे बेल्जियमला परतावे लागले.