राष्ट्रीय हरित लवादाकडून कार्यक्रमाबाबत सवाल; महोत्सवाबाबत अनिश्चितता
आर्ट ऑफ लिव्हिंग प्रतिष्ठानचे प्रमुख श्री श्री रविशंकर यांनी यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित केलेल्या जागतिक सांस्कृतिक महोत्सवावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी सदर महोत्सवाच्या समारोपाला हजर राहण्यास असमर्थता दर्शविलेली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी या महोत्सवाचे उद्घाटन करणार का, या बाबत तर्क-वितर्काना उधाण आले आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही या कार्यक्रमाबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत.
सदर कार्यक्रम यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात आयोजित करण्यात आल्यामुळे वाद उफाळून आला आहे. प्रणब मुखर्जी या कार्यक्रमाला का हजर राहणार नाहीत त्याचे स्पष्टीकरण राष्ट्रपती भवनातून देण्यात आले नसले तरी वादामुळेच मुखर्जी यांनी हजर न राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच आता शुक्रवारी नरेंद्र मोदी या महोत्सवाचे उद्घाटन करणार का, या बाबतच्या उलटसुलट चर्चेलाही उधाण आले आहे.
एनजीटीचा सवाल
यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात बांधकाम करण्यासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक का नाही, असा सवाल मंगळवारी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) केंद्र सरकारला केला. पूरप्रवण क्षेत्रात तात्पुरते बांधकाम उभारण्यासाठी वने आणि पर्यावरण विभागाच्या मंजुरीची का आवश्यकता नाही ते बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करून स्पष्ट करावे, असा आदेश एनजीटीचे अध्यक्ष स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने या विभागाला दिला.
तज्ज्ञांचे पथक तेथे पाहणीसाठी गेले असता त्यांना कार्यक्रमस्थळी दगडमातीचा कोणताही ढिगारा आढळला नाही आणि तात्पुरत्या बांधकामासाठी पर्यावरण विभागाच्या मंजुरीची गरज नाही, असे पर्यावरण विभागाच्या वकिलांनी लवादाला सांगितल्यानंतर सदर आदेश देण्यात आला.
यमुना नदीवर लष्कराने महोत्सवासाठी छोटा पूल बांधला, त्याबद्दलही लवादाने विचारणा केली असून याला कोणी परवानगी दिली, असा सवाल लवादाने दिल्ली विकास प्राधिकरणाच्या वकिलांना केला. दिल्ली विकास प्राधिकरण, दिल्ली सरकार आणि पर्यावरण विभागाने या पुलाच्या परवानगीबाबत हात
झटकले.
जैववैविध्यनगरी उभारणार – रविशंकर
आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात एक जैववैविध्यनगरी उभारणार असल्याचे श्री श्री रविशंकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले आणि त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्याच्या आरोपाचे जोरदार खंडन केले. यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्रात जागतिक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केल्यावरून रविशंकर सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या कार्यक्रमासाठी एकही वृक्ष तोडण्यात आलेला नाही तर केवळ चार वृक्षांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत, असे रविशंकर यांनी वार्ताहरांना सांगितले. जैववैविध्यनगरी उभारल्यानंतर आम्ही तेथून निघून जाणार आहोत, यमुना नदीतून आमच्या स्वयंसेवकांनी ५१२ टन कचरा काढला आहे, कोणतेही झाड आम्ही तोडलेले नाही, केवळ चार वृक्षांची किरकोळ छाटणी केली आहे, असे रविशंकर म्हणाले.