जागतिक नेत्याची छबी बनविण्याचा हेतू; यावर्षी पंतप्रधान २१ तर राहुल ४२ दिवस परदेशांत

भिंगरी लावल्यासारखे परदेश दौरे म्हटले की बहुतेकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींची छबी तरळते.. पण ही घट्ट झालेली प्रतिमा कदाचित चालू वर्षांमध्येतरी बदलायला लागेल. कारण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना चक्क नुसतेच मागे टाकले नाही, तर त्यांच्यापेक्षा दुप्पट काळ परदेशात व्यतित केला आहे. मोदी २१ दिवस, तर राहुल हे त्यांच्या दुप्पट म्हणजे ४२ दिवस देशाबाहेर राहिले.

आणि महत्वाचे म्हणजे कदाचित राहुल यांच्या परदेश दौरयांच्या मालिकेची ही फक्त सुरूवात असू शकते. नुकत्याच झालेल्या अमेरिका दौरयात मिळालेल्या अनपेक्षित प्रतिसादानंतर त्यांनी रशिया व चीनच्या दौरयावर जाण्याचे ठरविले आहे. सुमारे दहा दिवसांचे हे दौर कदाचित गुजरात निवडणुकीच्या तोंडावर असू शकतात. यामागे मोदींच्या पावलावर पाऊल ठेऊन स्वत:चीही जागतिक छबी निर्माण करण्याचा त्यांचा हेतू असल्याचे समजते. भारतातील दूरसंचार एक शिल्पकार असणारे सॅम पित्रोदा यांच्यावर त्याची जबाबदारी सोपविल्याचे समजते.

या दोन्ही नेत्यांच्या जानेवारीपासूनच्या परदेश दौऱ्यांच्या तपशीलावरून निघालेला निष्कर्ष प्रतिमेचा तडा देणारा आहे. मोदींनी २१ दिवसांच्या सहा दौरयांमध्ये १२ देशांना भेटी दिल्या, तर राहुल यांनी ४२ दिवसांमध्ये केवळ चारच देशांचे दौरे केले. त्यापैकी नवे वर्ष साजरे करण्यासाठी जानेवारीच्या प्रारंभी केलेल्या युरोप दौरयाचा आणि आजीला भेटण्यासाठी इटलीला केलेल्या दौरयाचा कोणताही तपशील उपलब्ध नाही. याउलट नार्वे आणि नुकत्याच झालेल्या अमेरिका दौरयामध्ये अधिकृत गाठीभेठी, परिसंवाद, प्रश्नोत्तरे यांची रेलचेल होती.

पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना नवे वर्ष साजरे करण्यासाठी लंडनसह युरोपला जाण्याची राहुल यांची कृती काँग्रेसमधील अनेकांना रूचली नव्हती. त्यातच पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असताना ते महत्वाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. पण पक्षांतर्गंत दबाबामुळे त्यांना तो दौरा रद्द करावा लागला

होता.  मध्यप्रदेशातील शेतकरी आंदोलन टिपेला असताना ते आजीला भेटण्यासाठी इटली गेले. सोळा दिवस तिथेच राहिले. वाढदिवसही तिथेच साजरा केला होता. पाटण्यामधील लालूप्रसाद यादव यांच्या महामेळाव्याला दांडी मारून त्यांनी नॉर्वेला जाणे पसंत केले होते. मात्र, अमेरिका दौरयामध्ये त्यांनी पाडलेल्या प्रभावाने पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोदींच्या सुसाट परदेश दौऱ्यांसह काँग्रेससह विरोधकांनी बोचकारे काढले होते. अगदी ‘अनिवासी भारतीय पंतप्रधान’ (एनआरआय पीएम) अशी शेलकी, उपरोधिक टिप्पणी केली जायची. पण आता स्वत: राहुल यांनीच मोदींचा कित्ता गिरवायचा ठरविल्याचे दिसते आहे.

मोदींनी तीन वर्षांमध्ये (२६ मे २०१७पर्यंत) २७ दौरयांमध्ये ४४ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी २७५ कोटींहून अधिक खर्च आला. १०५ दिवस ते देशाबाहेर होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांमध्ये ७३ दौरे केले आणि ९६ देशांना भेटी दिल्या. त्यासाठी ७९५ कोटींहून अधिक खर्च आला होता.

Story img Loader