इस्राईलमध्ये जवळपास ३०० स्त्री-पुरुष आपले कपडे काढून नग्नावस्थेत मृत समुद्राजवळ थांबलेले पाहायला मिळाले. यामुळे अनेकांचं लक्ष इस्राईलच्या मृत समुद्राकडे गेलंय. विशेष म्हणजे या सर्वांचा हेतू देखील जगाचं लक्ष वेधण्याचाच होता. इस्राईलमधील कमी कमी होणाऱ्या मृत समुद्राच्या पर्यावरणीय प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी खास फोटो सेशन करण्यात आलं. यात या ३०० जणांनी सहभाग घेतला. या सर्वांनी अंगाला पांढरा रंग लावून मग मृत समुद्राच्या किनाऱ्यावर पोज देत फोटो काढले. जवळपास ३ तास हे फोटोशूट सुरू होते.
इस्राईलमधील मृत समुद्र किनाऱ्यावर नेमकं काय घडलं?
मृत समुद्राला येऊन मिळणारं पाणी इस्राईल आणि परिसरातील देशांनी शेतीसाठी वळवल्यानं मागील काही काळापासून मृत समुद्राचं क्षेत्र घटत चाललं आहे. हा पर्यावरणीय समतोलाचा प्रश्न तयार झालाय. याकडे जगाचं लक्ष वेधून उपाययोजनांवर काम व्हावं म्हणून इस्राईलच्या पर्यटन मंत्रालयानं नग्नावस्थेत फोटो काढण्याच्या या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं. अमेरिकन छायाचित्रकार स्पेंसर ट्युनिक (Spencer Tunick) यांनी इस्राईल पर्यटन विभागासोबत मिळून हा मृत समुद्राच्या किनाऱ्यावरील कार्यक्रम आयोजित केला होता.
“इस्राईल अशा कलेला वाव असणारा मध्य पूर्वेतील एकमेव देश”
स्पेंसर ट्युनिक यांनी जगभरात विविध ठिकाणी असे फोटोशूट केले आहे. यात फ्रेंच वाईन देश, स्वीसमधील हिमनग आणि दक्षिण आफ्रिकेतील समुद्र किनाऱ्यांचा यात समावेश आहे. या उपक्रमाविषयी बोलताना स्पेंसर म्हणाला, “माझा इस्राईल भेटीचा अनुभव चांगला होता. मला पुन्हा इथं येऊन फोटोग्राफी करायला आवडेल. मध्य इशान्य भागात हा एकमेव देश आहे जिथं अशाप्रकारच्या कलेला परवानगी आहे.” त्यानं २०११ मध्ये देखील मृत समुद्राच्या किनाऱ्यावर असं फोटोशूट केलं होतं.
हेही वाचा : वृक्ष संरक्षण विधेयकात सुधारणा; मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडलेला प्राचीन वृक्ष जतन प्रस्ताव मंजूर
करोनाच्या काळात इस्राईलने बाहेरील पर्यटकांवर कठोर निर्बंध लावले आहेत. मात्र, आता कमी होत जाणाऱ्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर इस्राईल पुन्हा एकदा लसीकरण झालेल्या पर्यटकांना परवानगी देत आहे. आता या आर्टिस्टच्या फोटोशूटने जगभरातील लोक इथं येतील अशीही इस्राईलला अपेक्षा आहे.