अवघ्या दोनच दिवसांपूर्वी भ्रष्टाचार निर्मुलनाच्या आणाभाका घेणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे.  हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी राज्यात एका खाजगी कंपनीला जलविद्युत प्रकल्प पुर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्याच्या बदल्यात साडेतीन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केला. यासंबंधीची कागदपत्रेच जेटली यांनी पत्रकारपरिषदेत सादर केली. वीरभद्र सिंह यांच्याविरोधात सीबीआय व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याकडे तक्रार केल्याचे जेटली यांनी सांगितले.
    जेटली म्हणाले की, वेन्चर एनर्जी अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीला हिमाचल प्रदेशात जलविद्युत प्रकल्पाचे कंत्राट मिळाले होते. मुदतीत हा प्रकल्प पुर्ण झाला नाही. कंपनीला मुदतवाढ देण्यासाठी वीरभद्र सिंह यांनी पदाचा गैरवापर केला. दहा महिन्यांची मुदतवाढ मिळाल्यानंतर वीरभद्र यांची पत्नी व लोकसभा सदस्या प्रतिभा सिंह यांना संबधित कंपनीने साडेतीन कोटी रुपयांची लाच दिली. ही रक्कम दोन धनादेशांद्वारे दिल्याने सरळ सरळ भ्रष्टाचाराचे प्रकरण सिद्ध होते, असा दावा जेटली यांनी केला. गेल्या दशकात इतक्या उघडपणे भ्रष्टाचार झाला नसल्याचे जेटली म्हणाले. महाराष्ट्र सरकारने आदर्श गृहनिर्माण सोसायटी गैरव्यवहार प्रकरणाचा चौकशी अहवाल फेटाळल्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याची गरज  असल्याचे मत राहुल गांधी यांनी  अलीकडेच व्यक्त केले होते, याची आठवण जेटली यांनी करून दिली.  वीरभद्र सिंह यांनी भ्रष्टाचार केल्याचे कागदपत्रांवरून उघडपणे दिसत आहे. आता पंतप्रधान, सोनिया गांधी वा राहुल गांधी यांनी यासंबंधी बोलावे, असे आव्हान जेटली यांनी दिले. 

Story img Loader