नरेंद्र मोदी यांच्या विवाहाचा राजकीय मुद्दा बनवून राहुल गांधी यांनी अत्यंत भारतीय राजकारणाच्या अलिखित आचारसंहितेचा भंग केला आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांचे अनैतिक संबंध असताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विवाहाची उठाठेव कशासाठी करावी, या शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी राहुल यांच्यावर शनिवारी येथे जोरदार टीकेची तोफ डागली. काँग्रेसच्या नेत्यांची अशी प्रकरणे उघडकीस आली तर राहुल गांधी अस्वस्थ का होतात, अशीही विचारणा जेटली यांनी केली. मोदी यांनी आपल्याबद्दलची सत्य माहिती उघड केल्यासंदर्भात जेटली यांनी मोदी यांची जाहीर पाठराखण केली.
साधारणपणे राजकीय नेत्यांची कुटुंबे, त्यांच्या घरातील महिलावर्ग यांना आपण वादात न ओढण्याची भारतीय राजकारणात अलिखित प्रथा आहे. परंतु राहुल गांधी यांनी या प्रथेचाच भंग केला आहे, असा आरोप जेटली यांनी केला. आपल्या माजी पंतप्रधानांचे वैवाहिक जीवन तणावग्रस्त होते परंतु त्या गोष्टीचा कोणीही राजकीय मुद्दा केला नव्हता, याकडे लक्ष वेधत अरुण जेटली यांनी राहुल गांधी यांनी ही बाब कधीही विसरता कामा नये, असे ‘सल्ला’ दिला. मोदी यांच्या विवाहाचा उल्लेख करून राहुल यांनी उथळपणाच दाखवून दिला आहे, अशी टीका जेटली यांनी केली. राहुल गांधी यांच्या काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेते बाहेरख्यालीपणा करीत असतात आणि निवडणुकीचा अर्ज दाखल करतानाच केवळ आपल्या पत्नीला हजर करीत असतात. या पाश्र्वभूमीवर मोदी यांच्या विवाहाबद्दल कोणाला जाणून घ्यायचे असेल तर त्यांना तो हक्क जरूर आहे परंतु, काँग्रेसजनांच्या अशा अनैतिक संबंधांबद्दलही जाणून घेण्याचा लोकांना तेवढाच हक्क आहे, या शब्दांत जेटली यांनी शरसंधान केले.

Story img Loader