दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांचे सरकार आतापर्यंतचे सर्वात वाईट सरकार होते, असे भाजपचे नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. जनलोकपाल विधेयकावरून राजीनामा देण्याचा निर्णय म्हणजे, दु:स्वप्न अखेर संपले, असाच होता, असेही जेटली म्हणाले.
धोरण आखणे, सरकार चालवण्यापेक्षा सवंग प्रसिद्धीत त्यांना रस होता असा आरोप जेटली यांनी केला. कोणताही ठोस कार्यक्रम नसलेले आणि कोणतीही विचारसरणी नसलेले असे दिल्ली सरकार होते. त्यांच्या आमदारांना अनुभव नव्हता. सरकार चालवण्यापेक्षा सतत आंदोलनाचा पवित्रा त्यांनी घेतला.
दिल्लीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष होता तरीही आपने काँग्रेसचा पाठिंबा घेतला, या सरकारकडे जनमत नव्हते. आपचे बहुसंख्य आमदार हे अननुभवी आणि अपरिपक्व आहेत. ते आक्रमक झाले, मात्र प्रत्यक्ष कारभाराच्या वेळी परकीयांसारखी त्यांची वर्तणूक होती, असेही जेटली म्हणाले.
आपने पिण्याच्या पाण्याच्या पुरवठय़ाचा योजनांचा विस्तार करण्याचे ठरविले का, आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याच्या योजना आणल्या का, नवीन शाळा, महाविद्यालये स्थापन करण्याचा विचार केला का, दिल्ली मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याबाबत काही निर्णय घेतला का, दिल्लीत अधिक उड्डाणपूल आणि चांगले रस्ते बांधण्याचा विचार कधी त्यांनी केला का, असे सवालही जेटली यांनी उपस्थित केले.
केजरीवाल यांची कृती घटनाबाह्य़ – शिंदे
अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री स्वीकारताना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती त्याचा भंग केल्याचा आरोप गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. पदस्वीकारण्यापूर्वी आमदार, खासदारांना घटनेशी बांधील असल्याबाबतची शपथ घ्यावी लागते. मात्र केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेत जे जनलोकपाल विधेयक आणले ते नियमानुसार नव्हते असे सांगितले. त्याला काँग्रेस आणि भाजप दोघांनीही विरोध केला त्याचे समर्थन शिंदे यांनी केले.
केजरीवाल जबाबदारीपासून पळाले -लालूप्रसाद
आश्वासनांची पूर्तता करण्यात अरविंद केजरीवाल अयशस्वी ठरल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. केजरीवाल हे जबाबदारीपासून दूर पळत असल्याची टीकाही  केली.राजीनामा देण्यासाठी जनलोकपाल विधेयक हे केवळ कारण होते. मुख्यमंत्रीपदी राहून समस्यांचे निवारण करणे कठीण आहे.  सत्तेबाहेर राहून टीका करणे  शक्य होणार आहे, असे लालूप्रसाद यांनी ट्विट केले

Story img Loader