दिल्लीतील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या छोटय़ा घटनेला जगभर प्रसिद्धी मिळाल्याने भारताला जागतिक पर्यटनाच्या माध्यमातून त्याची किंमत लाखो डॉलरच्या रूपात मोजावी लागली, या असे विधान अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी पर्यटन मंत्र्यांच्या परिषदेत केले होते, त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर आता जेटली यांनी ती बलात्काराची घटना आपल्याला किरकोळ ठरवण्याचा कुठलाच उद्देश नव्हता, अशा शब्दांत बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
१६ डिसेंबरला झालेली बलात्काराची घटना संवेदनशीलच होती ती छोटी घटना होती असे सांगण्याचा आपला मुळीच उद्देश नव्हता असे ते म्हणाले.
जेटली म्हणाले, की आपण त्या विधानाबाबत खेद व्यक्त करतो, जो शब्द आपण वापरला तो असंवेदनशील होता, पण उद्देश मात्र असंवेदनशीलता दाखवण्याचा नव्हता. ते म्हणाले, की महिलांवरील गुन्हय़ांबाबत आपण वेळोवेळी आवाज उठवला आहे. आपण या प्रश्नांवर संवेदनशील आहोत, त्यामुळे हा गुन्हा किरकोळ समजण्याचा हेतू नव्हता. १६ डिसेंबरच्या विशिष्ट घटनेचा उल्लेख आपण केला नव्हता. आपण सर्वसाधारण असे विधान केले होते, की गुन्हेगारीमुळे विशेष करून महिलांविरुद्ध गुन्हय़ांमुळे देशाची प्रतिमा खराब होते व त्यामुळे पर्यटन उद्योग धोक्यात येतो, पर्यटक भारतात येत नाहीत एवढेच सांगण्याचा हेतू होता.
मुलीच्या आईवडिलांची टीका
जेटली यांच्या वक्तव्यावर बलात्कारित व खून झालेल्या मुलीच्या आईने टीका केली असून त्यांनी सांगितले, की मंत्र्यांनी आपल्याला निराश केले आहे. निवडणुकीत त्यांनी राजकीय फायद्यासाठी निर्भयाचे नाव वापरले पण सत्तेवर आल्यानंतर ते ती घटना किरकोळ होती असे म्हणत आहेत.मुलीच्या वडिलांनी सांगितले, की या वक्तव्याने आपण व्यथित झालो असून, कुठलाही बलात्कार छोटा व किरकोळ नसतो. तो देशाला मान खाली घालायला लावणारा असतो. जर सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती अशी विधाने करतात, तेव्हा ती असंवेदनशील असल्याचे दिसून येते. त्यांनी हे लक्षात ठेवावे, की ते जेव्हा बोलतात तेव्हा देश नव्हे जगातले लोक ऐकत असतात. काँग्रेसचे नेते रशीद अल्वी यांनी जेटली यांचे विधान दुर्दैवी असल्याचे सांगून म्हटले आहे, की जेव्हा एखाद्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा तो देशावर डाग असतो. जर मंत्रीच त्याला लहान व किरकोळ घटना म्हणत असतील, तर ते दुर्दैवी आहे. महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत प्रभावळकर यांनी सांगितले, की मंत्र्यांनी अशी टिपणी करणे चुकीचे असून देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा कसा फटका बसला याच्याशी तुलना करणे योग्य नाही.
दिल्ली बलात्कार प्रकरण किरकोळ ठरवले नाही
दिल्लीतील मुलीवर झालेल्या बलात्काराच्या छोटय़ा घटनेला जगभर प्रसिद्धी मिळाल्याने भारताला जागतिक पर्यटनाच्या माध्यमातून त्याची किंमत लाखो डॉलरच्या रूपात मोजावी लागली,
First published on: 23-08-2014 at 01:09 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun jaitley clarifies his remark on gangrape