अरुण जेटली यांचे मत; यापूर्वीचे प्रयोग फसल्याचा निष्कर्ष
देशाच्या राजकारणात काँग्रेस इतकी कमकुवत झाली आहे, की आता प्रादेशिक पक्षांचा समावेश असलेली कुठलीही राजकीय आघाडी ही पोकळी भरून काढू शकणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
ते म्हणाले, की भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी विरोधात पर्यायी राजकीय आघाडी सुरू करण्याच्या चर्चा रंगल्या आहेत, पण त्यात काही अर्थ नाही. काँग्रेस संपली असताना आता भाजपचा विरोधक कोण अशी चर्चा आहे, पण विरोधक विभागलेले आहेत. प्रादेशिक पक्षांच्या मदतीने राजकीय आघाडी तयार करण्याचे प्रयत्न केले जातील अशी चर्चा आहे, पण यापूर्वीही पर्यायी राजकीय आघाडी करण्याच्या अशा प्रयोगात कुठल्याही आशाआकांक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. असे प्रयोग करून झाले आहेत व ती अपयशी ठरलेली कल्पना आहे. भूतकाळात अशा आघाडय़ांची सरकारे यशस्वी झाली नाहीत, जेव्हा अशा आघाडय़ा तयार झाल्या तेव्हा त्या अपयशी ठरल्या आहेत.
काँग्रेस आता केवळ सहा राज्यांत सत्तेवर असून त्यात पाच छोटय़ा व पर्वतीय राज्यांचा समावेश आहे, त्यामुळे भाजप विरोधात दुसरा कुठला मोठा पक्ष अशी पर्याय निर्माण करू शकतो, असा प्रश्न जेटली यांना विचारला असता त्यांनी सांगितले, की ज्या अर्थी काँग्रेस संपली आहे त्याअर्थी भाजपला विरोध करण्यासाठी प्रमुख विरोधक कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही. जनता दल संयुक्तचे अध्यक्ष नीतिशकुमार यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, तो भाजपला मोठा धोका आहे काय, असे विचारले असता जेटली म्हणाले, की मला त्यात काही धोका वाटत नाही. असे असले तरी भाजप विरोधात कुणी ना कुणीतरी उभे राहील हे खरेच आहे, कारण राजकारणात पोकळी कधीच नसते, कारण ती पोकळी दुसरे कुणीतरी भरून काढत असते.
काँग्रेस आता केवळ सहा राज्यांत सत्तेवर असून त्यात पाच छोटय़ा व पर्वतीय राज्यांचा समावेश आहे.
-अरुण जेटली, अर्थमंत्री

Story img Loader