चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास सहकारी बँकांना कदापि परवानगी देणार नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. ते गुरूवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जेटली यांनी सहकारी बँकावर घातलेली बंदी उठविण्यास नकार दिला. अशी परवानगी दिली गेल्यास सहकारी बँका काळा पैसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असे जेटली यांनी सांगितले. रिझव्र्ह बँकेने १४ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बँकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांचे जाळे नसल्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही ही मागणी उचलून धरण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात याबद्दल उल्लेख करण्यात आला होता. मात्र, सरकारने सहकारी बँकांवर जुनी रोकड स्वीकारण्यास घातलेली बंदी उठवण्यास ठाम नकार दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा