लष्करप्रमुख दलबिर सिंग यांच्या नियुक्तीच्या वादावर अखेर संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी मौन सोडले असून एनडीए सरकार दलबिर सिंग यांच्या नियुक्तीवर पूर्णपणे सहमत असल्याचे म्हटले आहे.
राज्यसभेत संबोधित करत असताना अरुण जेटली यांनी व्ही.के.सिंग यांच्या वादग्रस्त ट्विटचा मुद्दाही फेटाळून लावला. देशाच्या सुरक्षाव्यवस्थेशी राजकीय आकसाने वागता कामा नये असेही जेटली म्हणाले. त्याचबरोबर व्ही.के.सिंग यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचेही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केले.
व्ही.के.सिंग यांनी लष्करप्रमुख दलबिरसिंग सुहाग यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त ट्विटवरून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या राजीमान्याची मागणी केली होती. “एखादे युनिट निष्पापांचा बळी घेऊन मनमानी करते आणि नंतर संस्थेचे प्रमुख त्यांना संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करतात मग त्यांना दोषी ठरवू नये?” या आशयाचे ट्विट व्ही.के.सिंग यांनी केले होते. यातून व्ही.के.सिंग यांनी सुहाग हे निष्पापांची हत्या करणाऱ्या व दरोडे घालणाऱ्या लष्करातील एका युनिटला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता.
If unit kills innocents,does dacoity and then head of organization tries to protect them, should he not be blamed?Criminals should go free!!
— Vijay Kumar Singh (@Gen_VKSingh) June 10, 2014
यापूर्वी लष्करप्रमुखपदी राहिलेल्या जनरल व्ही. के. सिंग यांनी याच सुहाग यांच्यावर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून चौकशीची कारवाई केली होती. मात्र सिंग यांच्या निवृत्तीनंतर बिक्रम सिंग यांनी लष्करप्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यावर, पंधराच दिवसांत व्ही. के. सिंग यांची कारवाई रद्द ठरवली आणि सुहाग यांना आर्मी कमांडर या पदावर बढती मिळाली. आता आपल्याच सरकारातील एका मंत्र्याच्या पूर्वीच्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेताना मोदी यांच्या सरकारने नवा पायंडा पाडला आहे