केरळमध्ये सध्या जो हिंसाचार सुरू आहे तोच प्रकार भाजपशासित राज्यांमध्ये घडला असता तर एव्हाना पुरस्कार वापसीचे सत्र सुरू झाले असते, असा टोला केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी डाव्या पक्षांना लगावला. ते रविवारी तिरूअनंतपुरम येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या आठवड्यात केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी रविवारी राजेशच्या कुटुंबियांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेटली यांनी मार्क्सवादी कम्युनिस्टप्रणित डाव्या पक्षांच्या आघाडीवर चौफेर हल्ला चढवला. डाव्या पक्षांच्या आघाडीचे सरकार असताना केरळात नेहमीच राजकीय हिंसाचार अनुभवायला मिळाला आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना शासन होणे, ही सरकारची जबाबदारीच आहे. डाव्या पक्षांचे सरकार आल्यानंतर प्रत्येकवेळी हिंसाचाराच्या घटना घडतात. राजकीय विरोधकांच्या निर्घृण आणि घृणास्पद पद्धतीने हत्या केल्या जातात, असा आरोप जेटली यांनी केला.
तसेच समजा केरळात ज्या पद्धतीचा राजकीय हिंसाचार झाला आहे तोच प्रकार भाजप किंवा ‘एनडीए’शासित अन्य राज्यांमध्ये घडला असता, तर काय झाले असते? असा सवाल जेटली यांनी उपस्थित केला. असे झाले असते तर पुरस्कार वापसीचे सत्र सुरू झाले असते, संसदेचे कामकाज रोखून धरले गेले असते आणि देशात व देशाबाहेर आंदोलने झाली असती, असा उपरोधिक टोला जेटली यांनी डाव्यांना लगावला. तसेच वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावं आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशीही मागणी जेटली यांनी केली आहे.
मागील आठवड्यात संघ कार्यकर्ता राजेश याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती, त्यावेळी त्याचा हातही तोडण्यात आला होता. ही हत्या सीपीएम नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आली असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. तर काही दिवसांपूर्वी राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये मारल्या गेलेल्या २१ जणांच्या नातेवाईकांनी आज सकाळी राजभवनाबाहेर सत्याग्रह केला होता. या सगळ्यांचे नातेवाईक राज्यात घडलेल्या काही ना काही घटनांमध्ये मारले गेले आहेत. राज्यात हिंसाचाराच्या घटनेत सीपीएमचा हात आहे असा अपप्राचार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जाणीवपूर्वक केला जातो , असा आरोप सीपीएमचे नेते अन्नावूर नागप्पन यांनी केला आहे. अरूण जेटली हे फक्त संघ कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाना भेटले, ज्या डाव्या कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबांना जेटली भेटायला का गेले नाहीत? असा प्रश्नही नागप्पन यांनी उपस्थित केला आहे.