केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले  पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. इतकंच नाही तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांसोबत आहोत आणि इथली परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असंही जेटली यांनी म्हटलं आहे. वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर पोलिसांनी लक्ष द्यावं आणि  गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी अशीही मागणी जेटली यांनी केली आहे.

केरळमध्ये आरएसएस कार्यकर्ता राजेश याची गेल्या आठवड्यात तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राजेशच्या कुटुंबियांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या हत्येच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सीपीएम यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.

आता संघ कार्यकर्त्याची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप आणि डावे यांच्यात वाद रंगणार हे उघड आहे. मागील आठवड्यात संघ कार्यकर्ता राजेश याची तीक्ष्ण हत्याराचे वार करून हत्या करण्यात आली होती, त्यावेळी त्याचा हातही तोडण्यात आला होता. ही हत्या सीपीएम नेत्यांच्या सांगण्यावरून करण्यात आली असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. तर काही दिवसांपूर्वी राजकीय हिंसेदरम्यान मारल्या गेलेल्या २१ जणांच्या नातेवाईकांनी रविवारी सकाळी राजभवनाबाहेर सत्याग्रहही केला.

या सगळ्यांचे नातेवाईक राज्यात घडलेल्या काही ना काही घटनांमध्ये मारले गेले आहेत. राज्यात हिंसाचाराच्या घटनेत सीपीएमचा हात आहे असा अपप्राचार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जाणीवपूर्वक केला जातो आहे असा आरोप सीपीएमचे नेते अन्नावूर नागप्पन यांनी केला आहे. अर्थमंत्री अरूण जेटली हे फक्त संघ कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबाना भेटले, ज्या डाव्या कार्यकर्त्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबांना जेटली भेटायला का गेले नाहीत? असा प्रश्नही नागप्पन यांनी उपस्थित केला आहे.

जेटलींचा केरळ दौरा कशासाठी?
केरळमधील राजकीय वातावरण कसं आहे याची पडताळणी अरूण जेटली करणार आहेत. केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सीपीएम आणि भाजप यांच्यात संघर्ष सुरू आहे, त्यामुळे इथे भाजपची ताकद वाढविण्यासाठी काय करता येईल याबाबत जेटली अवलोकन करणार आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे केरळमधील भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये केरळमध्ये आरएसएस कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे केरळमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी संघातर्फे करण्यात येते आहे, या पार्श्वभूमीवरही अरूण जेटली यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.

Story img Loader