पंजाब नॅशनल बँकेला ३० हजार कोटींचा चुना लावून नीरव मोदी देशाबाहेर पळून गेला. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांची मुलगी नीरव मोदीसोबत काम करते आहे असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. शिवामोगा येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. काँग्रेसवर भाजपाकडून भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. मात्र नीरव मोदी बाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्दही बोलत नाहीत. पंतप्रधानांनाही हे ठाऊक आहे की जेटली यांची मुलगी नीरव मोदीसोबत काम करते असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. १२ मे २०१८ या दिवशी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे कर्नाटकात भाजपा आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. ‘द न्यूज मिनिट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अशात शिवामोगा या ठिकाणी झालेल्या रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपावर आरोपांच्या फैरी झाडल्या. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुलगा जय शहानेही भ्रष्टाचार केला आहे. जय शहाने आपल्या बनावट कंपनीद्वारे ५० हजार रुपयांचे ८० कोटी रूपये कसे उभे केले याबाबत अमित शहा गप्प का आहेत? आपल्या भाषणात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मित्राला कंत्राट मिळावे म्हणून राफेल विमानांच्या करारात फेरफार केले. जर देशाच्या सुरक्षेसाठी राफेल विमानांची खरेदी करण्यात येते आहे आणि त्या विमानांचा उपयोग देश हितासाठीच केला जाणार आहे तर मग या विमानांचा करार नेमका किती रूपयांमध्ये झाला हे सांगण्यात काय अडचण आहे? मात्र या करारात भ्रष्टाचार असल्यानेच पंतप्रधान मूग गिळून गप्प बसले आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीत दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. याआधी भाजपानेही राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. देशासाठी गांधी घराण्याने काय केले? असा प्रश्न अमित शहा यांनी विचारला होता. तर स्मृती इराणी यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. आता राहुल गांधी यांनी अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावरच निशाणा साधला आहे. या आरोपांना भाजपाकडून कसे उत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पंजाब नॅशनल बँकेचा हजारो कोटींचा चुना लावून नीरव मोदी देशाबाहेर पळाला आहे. त्याच्यासोबत त्याचा मामा मेहुल चोक्सीही आहे. या दोघांबाबत नरेंद्र मोदी गप्प बसले आहेत असे आरोप आजवर काँग्रेसकडून केले जात होते. आज राहुल गांधी यांनी थेट जेटली यांना लक्ष्य करत त्यांची मुलगीच नीरव मोदीसोबत काम करते असे म्हटले आहे. याबाबत अरूण जेटली काय भाष्य करणार काय प्रत्युत्तर देणार हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.

 

Story img Loader