न्यायालयाच्या आवारात झालेली मारहाण निंदनीय पण त्याचवेळी देशाविरोधात दिलेल्या घोषणा अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही विरोधकांची भूमिका दूटप्पी असल्याची सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी गुरुवारी राज्यसभेमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ९ फेब्रुवारीच्या रात्री आयोजित केलेला कार्यक्रम देशाच्या विरोधातच होता. कार्यक्रमाचे पोस्टर्स, पत्रके हे सर्व देशाच्या एकात्मतेविरोधात होती. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच असल्याचेही अरूण जेटली यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर न्यायालयाच्या आवारात विद्यार्थ्याला आणि इतरांना झालेली मारहाणही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
रोहित वेमुला आत्महत्या आणि जेएनयू प्रकरणावरील चर्चेला राज्यसभेत गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. या चर्चेमध्ये बोलताना अरूण जेटली यांनी विरोधकांच्या दुटप्पीपणावर प्रहार केला. ते म्हणाले, देशाच्या भूमीवरच कोणी युद्ध छेडण्याची भाषा करीत असले तर त्याचे समर्थन कधीच करता येणार नाही. जेएनयूमध्ये त्या दिवशी देशविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये बसवणे चुकीचे आहे. १९६२ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना पश्चिम बंगालमधील एका कम्युनिस्ट नेत्याने काँग्रेसविरोधात वक्तव्य केले होते. त्या नेत्यावर त्यावेळी भारतीय दंडविधान संहितेतील कलम १२४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व न्यायालयांनी तो गुन्हा कायम ठेवत त्या नेत्याला शिक्षा दिली होती, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
जेएनयूच्या परिसरात जाऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करताना जेटली म्हणाले, १९८३ मध्ये काँग्रेसचेच सरकार असताना तेथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना बंधक बनवले होते. त्यावेळी दिल्ली पोलीसांनी परिसरात प्रवेश करून ३८० विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. ९ फेब्रुवारीला जेएनयूमध्ये घडलेली घटना ही त्यापेक्षा गंभीर आहे. त्यामुळे अशावेळी विद्यापीठात प्रवेश करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कुलगुरूंची परवानगी घेण्याची काहीही गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा